गडचिरोली : सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत, त्यानंतर प्रेमसंबंधांत आणि अखेरीस रक्तरंजित गुन्ह्यात झाल्याची धक्कादायक घटना एटापल्ली तालुक्यात उघडकीस आली आहे. लग्नास नकार दिल्याच्या रागातून एका युवकाने आपल्या मित्रावर चाकूने सपासप वार करत त्याचा गळा चिरून निर्घृण खून केल्याची घटना रविवारी सकाळी देवदा गावाजवळ घडली. या प्रकरणातील आरोपीला नागरिकांनी तत्परता दाखवत पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

मृत युवकाचे नाव सतीशकुमार जगदीशप्रकाश निसाद (३२, रा. नागेपल्ली, ता. अहेरी) असे असून, सूरज हलदार (३०, रा. मिरगन, ता. रायघर, जि. नबरंगपूर, ओडिशा) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना एटापल्लीपासून सुमारे २० किलोमीटर अंतरावरील हालेवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देवदा गावाजवळ घडली.

इन्स्टाग्रामवरील ओळखीचे प्रेमसंबंधांत रूपांतर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीशकुमार याचा नागेपल्ली येथे गॅरेज व्यवसाय आहे. काही महिन्यांपूर्वी त्याची आणि सूरज हलदारची ‘इन्स्टाग्राम’च्या माध्यमातून ओळख झाली होती. या ओळखीचे पुढे मैत्रीत आणि नंतर घनिष्ठ संबंधांत रूपांतर झाले. दरम्यान, सूरज याने सतीशकुमारकडे लग्नाची मागणी घातली होती. मात्र, सतीशकुमार हा विवाहित असल्याने त्याने त्यास नकार दिला होता.

ओडिशाला जाताना वाद अन् घातक हल्ला

दोन दिवसांपूर्वी सूरज हा सतीशकुमारला भेटण्यासाठी ओडिशाहून नागेपल्ली येथे आला होता. त्यावेळी सतीशकुमार विवाहित असल्याची माहिती त्याला मिळाली. रविवारी पहाटे सूरज आपल्या गावी परतण्यासाठी निघाला होता. त्याला सोडण्यासाठी सतीशकुमार आपल्या चारचाकी वाहनातून छत्तीसगड सीमाभागाच्या मार्गे ओडिशाच्या दिशेने जात होता.

देवदा गावाजवळ पोहोचल्यानंतर दोघांमध्ये सतीशकुमारच्या वैवाहिक स्थितीवरून तीव्र वाद झाला. त्यानंतर संतप्त झालेल्या सूरजने सोबत आणलेल्या चाकूने सतीशकुमारवर वार केले. गंभीर जखमी झालेल्या सतीशकुमारचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

नागरिकांच्या धाडसाने आरोपी जेरबंद

घटनेनंतर आरोपी पसार होण्याच्या तयारीत असताना परिसरातील नागरिकांनी प्रसंगावधान राखत त्याला पकडले. त्यानंतर पोलिसांना माहिती देऊन आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला.
आरोपी सूरज हलदार याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती हालेवारा पोलिस मदत केंद्राचे उपनिरीक्षक दाबेराव यांनी दिली. या घटनेमुळे एटापल्ली तालुक्यात खळबळ उडाली आहे.