गडचिरोली : तू शांत राहा, तुझी चिडचिडच तुझ्या त्रासाला कारणीभूत आहे, असा प्रेमाचा सल्ला देणे एका वृद्ध काकाला चांगलेच महागात पडले. काकाचा हा सल्ला जिव्हारी लागलेल्या पुतण्याने सूडबुद्धीने झोपेत असलेल्या काकाचा कुऱ्हाडीने गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना कोरची तालुक्यातील मुलेटीपदीकसा गावात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपी पुतण्याला बेड्या ठोकल्या आहेत.

पुनाराम बैसाकू धुर्वे (६५) असे मृताचे नाव असून, रामनाथ श्यामराव धुर्वे (२०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पुतण्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनाथ हा रोजगारासाठी बंगळुरू येथे गेला होता. चार महिन्यांपूर्वी तो गावी परतला. दरम्यान, माझे डोके खूप दुखते, एखादा चांगला वैद्य सांगा, अशी विचारणा त्याने काका पुनाराम यांच्याकडे केली होती. त्यावर काकांनी त्याला औषधासोबतच स्वभावातील चिडचिड कमी करण्याचा आणि शांत राहण्याचा सल्ला दिला. मात्र, हाच सल्ला रामनाथला अपमानस्पद वाटला आणि तेव्हापासून तो काकांचा द्वेष करू लागला होता.

शेतातील झोपडीत गाठले

५ मे रोजी रात्री पुनाराम हे नेहमीप्रमाणे गावातील शेतात असलेल्या झोपडीत झोपण्यासाठी गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास संधी शोधत असलेल्या रामनाथने तिथे दबा धरला. काका गाढ झोपेत असल्याची खात्री पटताच त्याने धारदार कुऱ्हाडीने त्यांच्या मानेवर सपासप वार केले. हा वार इतका भीषण होता की, पुनाराम यांचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर रक्ताने माखलेली कुऱ्हाड घटनास्थळीच फेकून आरोपीने तेथून पळ काढला.

पोलीस कारवाई आणि अटक

६ मे रोजी सकाळी ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली. कोरची पोलीस ठाण्याचे निरीक्षक शैलेंद्र ठाकरे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. संशयाची सुई रामनाथकडे वळताच सहाय्यक निरीक्षक मुकुंद देशमुख आणि उपनिरीक्षक योगेश पवार यांच्या पथकाने शोधमोहीम राबवून त्याला राहत्या घरातून अटक केली. आरोपीला ७ मे रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. क्षुल्लक कारणावरून पोटच्या पुतण्याने काकाचा काटा काढल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.