गडचिरोली : रक्ताचे नाते जेव्हा संपत्तीच्या लालसेपायी वैरी बनते, तेव्हा त्याचे परिणाम किती भीषण असू शकतात, याचे थरारक उदाहरण कोरची तालुक्यात समोर आले आहे. जमिनीच्या वादातून आपल्याच तरुण पुतण्याची कुऱ्हाडीने हत्या करून त्याचा मृतदेह जंगलात गाडणाऱ्या काकाचा आणि त्याच्या साथीदाराचा पोलिसांनी तब्बल अडीच वर्षांनी छडा लावला आहे. ‘डीएनए’ अहवालाने या हत्याकांडाचा गुंता सोडवल्याने आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.
नेमकी घटना काय?
आंबेखारी येथील २३ वर्षीय तरुण महेश शामसाय कळ्यामी हा जुलै २०२४ पासून बेपत्ता होता. दरम्यान, नोव्हेंबर २०२४ मध्ये महेशची आई दुमलाबाई जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेली असता, तिला एका ठिकाणी पुरलेले प्रेत व मानवी हाडांचा सांगाडा आढळून आला. हा सांगाडा आपल्या बेपत्ता मुलाचा असावा, असा संशय त्यांनी व्यक्त केला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तहसीलदार यांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. मात्र, मृतदेहाची ओळख पटवणे कठीण असल्याने त्याचे अवशेष डीएनए चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते.
‘डीएनए रिपोर्ट’ आणि संशयाची सुई
२८ फेब्रुवारी २०२६ रोजी प्राप्त झालेल्या डीएनए अहवालातून तो मृतदेह महेशचाच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे यांच्या पथकाने तपासचक्र फिरवले. मृत महेश हा त्याचे वडील शामसाय आणि मोठे काका रामदास यांच्याकडे जमिनीतील हिश्यावरून सतत भांडण करायचा. जुलै २०२४ मध्ये देखील जमिनीच्या वादातून रामदास आणि महेशमध्ये जोरदार खडाजंगी झाली होती. वादाच्या दिवशी रामदास आणि त्याचा साथीदार दसरू कल्लो यांनी महेशचा पाठलाग करून त्याला जंगलात नेले. तिथे त्याची निर्घृण हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह जमिनीत गाडून टाकला. घटनेनंतर रामदासने रक्ताने माखलेली कुऱ्हाड धुवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.
कोरची पोलिसांनी २ मार्च २०२६ रोजी आरोपी रामदास अमरु कळ्यामी (५९) आणि दसरू ठाकूरराम कल्लो (४२) यांना अटक केली आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१), २३८(ब) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी मुकुंद देशमुख, एएसआय दलपत मडावी आणि पथकाने ही गुंतागुंतीची केस यशस्वीरीत्या तडीस नेली.
