गडचिरोली : देसाईगंज तालुक्यात प्रशासनाच्या आशीर्वादाने वाळू माफियांचा धुमाकूळ सुरूच असून कोंढाळा परिसरातील सिंड्राई वाळूघाटावर मुदत संपल्यानंतरही सुरू असलेल्या कथित बेकायदा वाळू उपशादरम्यान एका मजुराचा यंत्राखाली चिरडून मृत्यू झाला. विलास महादेव देवढगले (वय ३४, रा. जुनी वडसा) या निष्पाप मजुराचा झालेला मृत्यू हा केवळ अपघात नसून, अवैध वाळू उपसा, माफियांची बेलगाम मनमानी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाचा बळी असल्याची संतप्त प्रतिक्रिया आता व्यक्त होत आहे.

बुधवारी (२५ जून) सकाळी सिंड्राई वाळूघाटावर मोठ्या यंत्रांच्या सहाय्याने वाळूचा उपसा करून ती ट्रॅक्टरमध्ये भरली जात होती. विलास देवढगले हा चालक तसेच मजूर म्हणून तेथे काम करत असताना अचानक वाळू उपसणाऱ्या यंत्राखाली दबला गेला. गंभीर जखमी झालेल्या विलासचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच देसाईगंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. याबाबत देसाईगंजचे पोलीस निरीक्षक अजय जगताप यांनी, मृत्यूचे नेमके कारण तपासाअंती स्पष्ट होईल आणि सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू असल्याचे सांगितले.

अपघात की पुरावे दडपण्याचा प्रयत्न?

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथे जड यंत्रसामग्री व वाहनांच्या हालचालींचे स्पष्ट पुरावे आढळून आले आहेत. मात्र, सुरुवातीला हा प्रकार लपविण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. मजूर वाहनातून पडल्याने मृत्यू झाल्याचा बनाव रचून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, परिसरात प्रत्यक्ष घटनेची माहिती पसरल्यानंतर हा डाव फसल्याचे सांगितले जात आहे.

मुदत संपल्यानंतरही घाटावर वाळूचा उपसा सुरू कसा?

या संपूर्ण प्रकरणात सर्वात गंभीर बाब म्हणजे सिंड्राई वाळूघाटावरील परवानगीची मुदत संपल्यानंतरही मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा सुरू होता, असा आरोप होत आहे. जर घाट बंद होता, तर जड यंत्रसामग्री तेथे पोहोचली कशी? ट्रॅक्टरमधून वाळूची वाहतूक कोणाच्या आशीर्वादाने सुरू होती? महसूल यंत्रणा आणि संबंधित विभागांना याची माहिती नव्हती का? अशा अनेक प्रश्नांमुळे प्रशासनावर शंका उपस्थित केली जात आहे.

उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश

मुदत संपल्यानंतरही सिंड्राई घाटावर वाळूचा उपसा कोणाच्या परवानगीने सुरू होता, याची सखोल चौकशी करण्याचे आदेश तहसीलदारांना देण्यात आले आहेत. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी प्रसेनजित प्रधान यांनी दिली.