गडचिरोली : वैनगंगा नदीपात्रातील अवैध वाळू उत्खननाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांनाच अंगावर डोझर घालून धाक दाखविण्याचा प्रकार सावंगी येथे घडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या अंधारात पोकलेनच्या साह्याने सुरू असलेल्या बेसुमार वाळू उपशामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून, वारंवार तक्रारी करूनही महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

देसाईगंज तालुक्यातील मौजा सावंगी येथील वैनगंगा नदीपात्रात कंत्राटदाराकडून पोकलेनच्या साह्याने दिवस-रात्र वाळूचे उत्खनन सुरू असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. या अनिर्बंध उपशामुळे गावाच्या नैसर्गिक संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या प्रकाराची माहिती वरिष्ठ महसूल अधिकारी आणि देसाईगंज पोलिसांना वारंवार देऊनही उत्खनन थांबविण्यासाठी प्रभावी पावले उचलली गेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

कारवाईसाठी गेलेल्या ग्रामस्थांनाच धमकावले!

२१ ऑक्टोबर रोजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील आणि तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे वाळू घाटावर धडक देत अवैध उत्खनन बंद पाडले होते. मात्र, ग्रामस्थांच्या या प्रयत्नांना जेमतेम तासाभराची मुदत मिळाली. त्यानंतर पुन्हा नदीपात्रात उत्खनन सुरू करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

यानंतर २७ ऑक्टोबर रोजी ग्रामस्थांनी पुन्हा घाटावर जाऊन वाळू वाहतूक करणारी वाहने आणि उत्खनन बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी डोझर चालकाने थेट ग्रामस्थांच्या अंगावर वाहन आणून त्यांना धडक देण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेच्या वेळी पोलीसही उपस्थित होते. मात्र, त्यांच्या समक्ष हा प्रकार घडूनही संबंधितांविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्र्यांकडे धाव; आंदोलनाचा इशारा

स्थानिक प्रशासनाच्या कथित निष्क्रियतेमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे मनोबल वाढले असून, त्यांना कोणाचे अभय आहे, असा सवाल सावंगीवासीयांनी उपस्थित केला आहे. नदीपात्रातील अवैध उत्खनन तातडीने बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. यासंदर्भात देसाईगंज तहसीलदार प्रीती डुडुलकर यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.