गडचिरोली : जिल्हा नियोजन समितीवरील नामनिर्देशित आणि विशेष निमंत्रित सदस्यांच्या निवडीवरून गडचिरोलीतील महायुतीत अंतर्गत धुसफूस सुरु झाली आहे. या निवडीत भाजपचा वरचष्मा दिसत असला, तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्यांसह भाजपमधील अहेरी आणि गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील काही प्रमुख नेत्यांनाही डावलण्यात आल्याने दोन्ही पक्षांत नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असताना ही यादी अंतिम करताना त्यांनाही अंधारात ठेवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राज्याच्या नियोजन विभागाकडून तीन नोव्हेंबर रोजी समितीवरील सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली. जिल्ह्याच्या विकासकामांचे प्राधान्यक्रम ठरविणे आणि कोट्यवधींच्या निधीच्या नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या समितीवरील निवडीकडे राजकीय पक्षांचे विशेष लक्ष होते. मात्र, जाहीर झालेल्या यादीने महायुतीतील राजकीय समीकरणांनाच धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला अपेक्षित प्रतिनिधित्व न मिळाल्याने या पक्षात नाराजी आहेच; परंतु भाजपमधील स्थानिक नेत्यांचीही नावे वगळण्यात आल्याने पक्षांतर्गत असंतोषाची भर पडली आहे.

भाजप, शिवसेनेचा वरचष्मा; राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी

विधान मंडळांतील सदस्यांमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मरावबाबा आत्राम आणि भाजपचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची समितीवर निवड झाली आहे. विशेष निमंत्रित सदस्य म्हणून माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, कृष्णा गजबे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, डॉ. संगीता राऊत, शिवसेनेचे राकेश बेलसरे, वर्षा मोरे आणि संदीप ठाकूर यांचा समावेश आहे. मात्र, या निवडीत अजित पवार गटातील स्थानिक पदाधिकाऱ्यांना संधी न मिळाल्याने मित्रपक्षातील नाराजी वाढली आहे.

पालकमंत्र्यांनाच डावलले?

या संपूर्ण घडामोडीत सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका. अहेरी आणि गडचिरोलीतील भाजपच्या काही नेत्यांची नावेही अंतिम यादीत नसल्याने ही निवड नेमकी कुणाच्या शिफारशीवरून झाली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पालकमंत्र्यांच्या संमतीशिवाय यादी अंतिम करण्यात आली की स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांना अधिक महत्त्व देण्यात आले, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. महायुतीतील घटकपक्षांना विश्वासात घेऊन राजकीय समतोल साधण्याऐवजी निवडीच्या प्रक्रियेत एकाच गटाचे वर्चस्व असल्याने मित्रपक्षांसह भाजपमधूनही दबक्या आवाजात असंतोष व्यक्त होत आहे.