गडचिरोली : जिल्ह्यातील डोंगरगाव परिसरात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणातील आरोपीदेखील अल्पवयीन असून, पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने स्वतः फिर्यादी बनत खोटी तक्रार दाखल केल्याचे तपासात समोर आले. मात्र, मोबाईल चॅटिंग, तांत्रिक तपास आणि पोलिसांच्या कसून चौकशीतून काही तासांतच संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. बादल नकटुजी कोसनकर (वय १७, रा. डोंगरगाव) असे मृत मुलाचे नाव आहे. आरोपी मृतकाचा मित्र असून तोही अल्पवयीन आहे.

थंड डोक्याने रचला खुनाचा कट

दोन दिवसांपूर्वी बादलने आरोपीच्या बहिणीबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्याने दोघांमध्ये वाद झाला होता. त्याचाच राग मनात धरून आरोपीने बादलचा खून करण्याचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले. बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास आरोपीने बादलला ‘गांजा ओढण्यासाठी जाऊया’ असे सांगून गडचिरोली-गुरवाळा मार्गावरील दाट जंगल परिसरात नेले. परस्परांतील जुनी मैत्री असल्याने बादलने त्याच्यावर विश्वास ठेवला. जंगलात गेल्यानंतर वडिलांनी घरी बोलावले असल्याचे सांगून काही वेळातच दोघेही परत निघाले. बादल पुढे चालत असताना आरोपीने मागून त्याच्यावर कुऱ्हाडीने वार केले. डोक्यावर आणि पाठीवर सलग वार करण्यात आल्याने बादल गंभीर जखमी झाला. वार इतके भीषण होते की, कुऱ्हाड त्याच्या डोक्यात अडकून राहिली आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

घटनेनंतर आरोपी स्वतः गडचिरोली पोलीस ठाण्यात पोहोचला. पैसे देणे-घेण्याच्या वादातून तीन अनोळखी व्यक्तींनी बादलचा खून केल्याची खोटी तक्रार त्याने पोलिसांकडे नोंदवली. मात्र, घटनास्थळाची पाहणी आणि आरोपीच्या जबाबातील विसंगती लक्षात आल्यानंतर पोलिसांना संशय आला. पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने मृत बादल आणि आरोपीचे मोबाईल जप्त केले. मोबाईलमधील चॅटिंग, संभाषणे आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी चौकशीचा फास आवळला. अखेर पोलिसी चौकशीत फिर्यादीनेच गुन्ह्याची कबुली दिली.

अल्पवयीनांतील वाढत्या हिंसक प्रवृत्तीबाबत चिंता

या प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक पूजा नैताम, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण बुंदे आणि त्यांच्या पथकाने तपासाची कारवाई केली. या घटनेत मृत मुलगा आणि आरोपी दोघेही अल्पवयीन असल्याने किशोरवयीन मुलांमध्ये वाढती हिंसक प्रवृत्ती आणि गुन्हेगारी मानसिकता याबाबत पुन्हा चिंता व्यक्त होत आहे.