गडचिरोली : कॉलेजमधून सायकलने घरी परतणाऱ्या विद्यार्थिनीला रस्त्याच्या कामावरील एका भरधाव पाण्याच्या टँकरने चिरडले. या भीषण अपघातात रिया श्रावण पदा (१६) हिचा जागीच मृत्यू झाला. अवघ्या एक वर्षाची असताना वडिलांचे छत्र हरवलेल्या रियाच्या रूपाने तिच्या विधवा आईचा एकमेव आधारही या अपघाताने हिरावून घेतला आहे.

रिया ही कारवाफा येथील राजीव गांधी हायस्कूलमध्ये ११ वीत शिक्षण घेत होती. शाळा सुटल्यानंतर ती आपल्या मैत्रिणींसह सायकलने घराकडे निघाली होती. घर अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असताना, मागून येणाऱ्या रस्त्याच्या कामावरील टँकरने (क्र. एमएच ३३-४०९५) तिला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, टँकरचे चाक थेट रियाच्या डोक्यावरून गेले. यात तिचा जागीच मृत्यू झाला असून, घटनास्थळावरील दृश्य काळजाचा थरकाप उडवणारे होते.

रियाचे मूळ गाव दावंडी असून, ती अवघ्या एक वर्षाची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर तिची आई वनिता ही आपल्या बहिणीकडे जांभळी येथे वास्तव्यास आली होती. गेल्या १५ वर्षांपासून काका उमेश करंगामी यांनी रियाला पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळून तिचे शिक्षण सुरू ठेवले होते. शुक्रवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर रियाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. जांभळी येथे शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तिच्या आईने आणि नातेवाईकांनी केलेला आक्रोश पाहून उपस्थितांची मने हेलावून गेली होती.

दरम्यान, अपघातावेळी टँकरचालक रामेश्वर विलास चिमलवार (४०, रा. भामरागड) हा नशेत असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. उमेश करंगामी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चालकाविरुद्ध मोटार वाहन अधिनियमासह सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून एका कोवळ्या जिवाचा बळी घेणाऱ्या चालकाबाबत परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.