गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी उपविभागासह तेलंगणा सीमा लगतच्या भागाला बुधवारी मध्यरात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रात्री ११ वाजून ५१ ते ५९ मिनिटांच्या सुमारास आलापल्ली, सिरोंचा आणि अहेरी परिसरात जमिनीला कंपने जाणवल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली. या भूकंपाची तीव्रता ३.९ रिश्टर स्केल नोंदवण्यात आली असून, याचे केंद्रबिंदू तेलंगणा राज्यातील मंचेरियाल जिल्ह्यात रामगुंडमपासून ३५ किलोमीटर अंतरावर होते.गेल्या पाच वर्षांत या भागाला बसलेला हा पाचवा धक्का आहे.
विशेष म्हणजे हा संपूर्ण परिसर कोळशाच्या खाणी आणि विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमुळे ‘भूकंप प्रवण क्षेत्रात’ मोडतो. वारंवार होणाऱ्या या हालचालींमुळे महाराष्ट्र-तेलंगणा सीमा भागातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.यापूर्वी मागील वर्षी ५.३ रिश्टर स्केलचा मोठा धक्का जाणवला होता, ज्याचे केंद्र तेलंगणातील मुलुगू येथे होते.
मात्र, मध्यरात्री झालेल्या या धक्क्याने नागरिकांच्या चिंतेत भर घातली आहे. गोदावरी खोऱ्यातील हा भाग भूकंप प्रवण क्षेत्र ३ मध्ये येत असतानाच, येथे असलेल्या कोळसा खाणी आणि मेडीगड्डा सारख्या मोठ्या धरण प्रकल्पांमुळे भूगर्भातील नैसर्गिक संरचनेला धक्का बसत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
तेलंगणातील कालेश्वरम उपसा सिंचन योजनेअंतर्गत मेडीगड्डा धरणाच्या बांधकामामुळे भूगर्भातील दाबावर परिणाम झाल्याची चर्चा आधीच सुरू आहे.
त्यातच रामगुंडम परिसरातील खाणकामाचा विस्तार आणि भौगोलिक बदल यामुळे या भागात भूकंपाची वारंवारता वाढल्याचे दिसून येत आहे.मागील पाच वर्षांचा आढावा घेतल्यास गडचिरोलीच्या दक्षिण भागाला पाच वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत. यापूर्वी उमानूर, जाफ्राबाद आणि महागांव परिसरात केंद्रबिंदू होते.
मात्र, आता केंद्रबिंदू तेलंगणात सरकत असून त्याची तीव्रता ३.९ पर्यंत पोहोचल्याने भविष्यात मोठ्या धोक्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा परिसर आधीच संवेदनशील क्षेत्रात येतो. कोळशाच्या खाणींमधील हालचाली आणि मोठ्या धरणांमधील पाण्याचा साठा यामुळे भूगर्भातील प्लेट्सवर ताण निर्माण होतो.

