गडचिरोली : लग्नकार्यात गाण्याच्या तालावर ठेका धरणे ही सध्याची सामान्य बाब झाली असली, तरी एटापल्ली तालुक्यातील कृष्णार येथे हेच नृत्य आदिवासी युवकांसाठी कायदेशीर कचाट्याचे कारण ठरले आहे. मृत नक्षल कमांडर हिडमाचे उदात्तीकरण करणाऱ्या गाण्यावर नृत्य केल्याच्या कारणावरून पोलिसांनी पाच युवकांवर गुन्हे दाखल केल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून, या कारवाईच्या निषेधार्थ कृष्णार येथील ग्रामसभेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर ही गदा असल्याचे सांगत हे गुन्हे त्वरित मागे घेण्याची मागणी ग्रामसभेने केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ६ मे रोजी कृष्णार येथे एका विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात डीजेवर हमारे हक की जंग है हिडमा हे गीत वाजवण्यात आले आणि त्यावर काही तरुणांनी नृत्य केले. मात्र, या गीताच्या आशयावरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका घेत एटापल्ली पोलिसांनी संबंधित तरुणांवर गुन्हे दाखल केले. ही कारवाई अन्यायकारक असल्याची भावना व्यक्त करण्यासाठी कृष्णार येथील सार्वजनिक गोटूल भवन येथे किशोर फिरंगी कांदो यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली होती.
या सभेत चर्चेदरम्यान ग्रामस्थांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला. ज्या गाण्यावर ही कारवाई करण्यात आली, ते गीत सोशल मीडियावर सर्वत्र उपलब्ध असून त्यावर कोणत्याही न्यायालयाने अधिकृतपणे बंदी घातलेली नाही, असा दावा ग्रामसभेने केला आहे. संबंधित युवक हे कोणत्याही हिंसक कारवायांमध्ये गुंतलेले नसून केवळ लग्नाचा आनंद साजरा करत असताना त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे हे लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये गाण्यावर नृत्य करणे हा मानवी हक्क असून, अशा प्रकारे थेट फौजदारी कारवाई करणे हे आदिवासी समाजाला दबावाखाली ठेवण्याचे प्रयत्न असल्याचेही ग्रामस्थांनी नमूद केले.
भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला आपले विचार मांडण्याचे आणि सण-उत्सव साजरे करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे, याची आठवण करून देत ग्रामसभेने प्रशासनाला हे गुन्हे तात्काळ मागे घेण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणावरून आता स्थानिक प्रशासन आणि आदिवासी समाज यांच्यातील संघर्ष चिघळण्याची शक्यता निर्माण झाली असून, पोलीस प्रशासन आता काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
