गडचिरोली : अमेरिकेच्या ‘नासा’ संस्थेला दुर्मिळ धातू विकून त्याचे तब्बल २ लाख ३० हजार कोटी भारतीय रिझर्व्ह बँकेत जमा झाले आहेत, असे अजब कथानक रचून एटापल्ली येथील एका आदिवासी शेतकऱ्याला ६ लाख ५० हजार रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी एटापल्ली पोलिसांनी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, या रॅकेटमध्ये शंभरहून अधिक लोकांची फसवणूक झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नेमके प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पैमा (ता. एटापल्ली) येथील कोलु वंज्या तलांडी (४२) या शेतकऱ्याला त्यांच्याच गावातील रमेश रैनू तलांडी आणि सुरेंद्र पांडुरंग मडावी यांनी एका ‘जागतिक’ योजनेचे आमिष दाखवले. छत्तीसगडमधील एका व्यक्तीला ‘कोसमस मेटल’चा ६ किलोचा दुर्मिळ खडा सापडला असून तो ‘नासा’ला विकल्याचा दावा आरोपींनी केला होता. या व्यवहाराचे २ लाख ३० हजार कोटी रुपये रिझर्व्ह बँकेतील खात्यात अडकले असून, ते खाते ‘अनब्लॉक’ करण्यासाठी पैशांची गरज असल्याचे भासवून तक्रारदाराचा विश्वास संपादन करण्यात आला.

आमिषाचा ‘व्हीआयपी’ सापळा

या फसवणुकीचा मुख्य सूत्रधार भामरागडचा वासुदेव गिल्ला वड्डे असल्याचे सांगण्यात आले. ‘आत्ता ५५ हजार रुपये भरल्यास, काम पूर्ण झाल्यावर ४० कोटी रुपये मिळतील,’ असे अचाट आमिष तलांडी यांना दाखवण्यात आले. जुन्या मैत्रीचा फायदा घेत आरोपींनी ७ मार्च २०२५ रोजी त्यांच्याकडून ५५ हजार रुपये उकळले. त्यानंतर ‘आरबीआय’कडून गिफ्ट म्हणून गाडी मिळणार असल्याचे सांगून पुन्हा १० हजार रुपये घेतले. आरोपींनी ‘व्हीआयपी’ नावाचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून त्यात ११६ सदस्यांना जोडले होते. दिल्ली-कोलकात्याला आरबीआय गव्हर्नरला भेटायला जायचे आहे, असे सांगून २ ते १५ हजार रुपयांपर्यंतची रक्कम वेळोवेळी वसूल केली.

‘डिसेंबरपर्यंत करोडपती व्हाल’

दिवाळीच्या सुमारास मरपल्ली रोडवरील एका शेतात आरोपी वासुदेव वड्डे याने १०० लोकांची गुप्त बैठक घेतली होती. ‘डिसेंबरपर्यंत तुम्ही सर्वजण करोडपती व्हाल,’ असे सांगून त्याने उपस्थितांकडून पैसे गोळा केले होते. मात्र, जेव्हा तक्रारदार कोलु तलांडी यांनी आपल्या साडेसहा लाख रुपयांचा हिशोब मागितला, तेव्हा आरोपींनी त्यांना धमकावून ग्रुपमधून बाहेर काढले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी एटापल्ली पोलीस ठाण्यात धाव घेतली. रिझर्व्ह बँक किंवा कोणतीही अधिकृत सरकारी संस्था अशा प्रकारे कधीही पैशांची मागणी करत नाही. दुर्मिळ धातू किंवा खजिना शोधण्याच्या अशा कोणत्याही भ्रामक योजनांना नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.