गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील जारावंडी परिसरात वाघाच्या हल्ल्यांचे सत्र सुरूच असून, सोमवारी (२ नोव्हेंबर) दिंडवी येथील ६८ वर्षीय सदाशिव दुग्गा यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. शेतात बैल चारत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक झडप घातली. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर वाघाने मृतदेह सुमारे ५०० मीटरपर्यंत फरफटत नेल्याने शरीराची छिन्नविछिन्न अवस्था झाली होती. जारावंडी परिसरातील ही तिसरी घटना असून, सलग होणाऱ्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

जारावंडीपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या दिंडवी गावातील सदाशिव दुग्गा हे नेहमीप्रमाणे सोमवारी दुपारी बैल चारण्यासाठी शेतात गेले होते. सायंकाळी चार ते पाचच्या सुमारास दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात त्यांना बचावाची संधीही मिळाली नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा आणि नातवंडे असा परिवार आहे.

यापूर्वी डोलंदा येथील ५७ वर्षीय बोहरण वड्डे आणि १९ ऑक्टोबर रोजी इरपनपायली येथील ७० वर्षीय बिलाशी आनंद बा यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. आता दुग्गा यांच्या मृत्यूने परिसरातील वाघाच्या हल्ल्यांतील बळींची संख्या तीन झाली आहे. त्यामुळे शेतात जाणे, भात कापणी करणे आणि जनावरे चारणेही जीवघेणे ठरू लागले आहे.

विशेष म्हणजे, बोहरण वड्डे यांच्या मृत्यूनंतर जारावंडी येथे ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतरही ठोस उपाययोजना न झाल्याने तिसरा बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.

दरम्यान, दुग्गा यांच्या मृत्यूनंतर संतप्त ग्रामस्थांनी पंचनाम्याची प्रक्रिया रोखून वनाधिकाऱ्यांना जाब विचारला. वाघाचा बंदोबस्त करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय पुढील प्रक्रिया होऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. अखेर कसनसूर वनपरिक्षेत्र अधिकारी वनराज नगराळे यांनी १५ दिवसांत वाघाचा बंदोबस्त करण्याचे लेखी आश्वासन दिले. तीन नागरिकांचा बळी गेल्यानंतरही वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली नसल्याची नाराजी ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.