गडचिरोली : बंदूक खाली ठेवून मुख्य प्रवाहात परतण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता माजी नक्षलवाद्यांच्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा सुरू झाला आहे. नक्षल नेता भूपतीसोबत आत्मसमर्पण केलेल्या त्याच्या सहकाऱ्यांपैकी छत्तीसगडमधील ५० जणांना सोमवारी गडचिरोलीतून त्यांच्या स्वगृही परत पाठविण्यात आले. निरोपाच्या वेळी अनेकांच्या डोळ्यांत अश्रू होते. वर्षानुवर्षे जंगलात गेलेले आयुष्य मागे सोडून आता कुटुंबीयांच्या कुशीत परतण्याची वेळ आल्याने वातावरण भावुक झाले होते.

एकेकाळी छत्तीसगडमधील गावांपासून दूर, घनदाट जंगलात आणि नक्षल चळवळीच्या सावलीत गेलेले आयुष्य आता बदलू लागले आहे. हातातील शस्त्र सोडल्यानंतर गडचिरोलीत पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू झाली आणि त्यातूनच या माजी नक्षलवाद्यांना हळूहळू आपल्या मातीशी पुन्हा जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. माजी सर्वोच्च नक्षल नेता भूपतीसह मोठ्या संख्येने नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर गडचिरोली पोलिसांसमोर नक्षलविरोधी लढ्याला एक नवे वळण मिळाले. मात्र आत्मसमर्पण म्हणजे केवळ शस्त्र खाली ठेवणे नव्हे. त्यानंतरचे पुनर्वसन, समाजाच्या मुख्य प्रवाहात पुनरागमन आणि कुटुंबाशी पुन्हा जुळवून घेणे हा त्याहून मोठा प्रवास आहे.

मूळ गावी परतण्याची परवानगी

याच प्रवासातील पुढचे पाऊल म्हणून आता आत्मसमर्पित माजी नक्षलवाद्यांना टप्प्याटप्प्याने त्यांच्या मूळ गावी परतण्याची परवानगी दिली जात आहे. सोमवारी छत्तीसगडमधील ५० जणांची झालेली रवानगी त्याच प्रक्रियेचा भाग ठरली. निरोपाच्या वेळी मात्र चेहऱ्यावरचे भाव वेगळेच होते. गडचिरोलीत आत्मसमर्पण करून नव्या आयुष्याची सुरुवात करणारे हे माजी नक्षलवादी आता पुन्हा आपल्या गावाच्या वाटेवर निघाले होते. कुणाला आई-वडिलांना भेटण्याची ओढ होती, कुणाला पत्नी-मुलांना पुन्हा जवळ घेण्याची आस; तर कुणासाठी वर्षानुवर्षे दूर राहिलेली गावची मातीच सर्वात मोठी हाक होती.

नव्याने आयुष्य उभे करा

यावेळी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी आत्मसमर्पित सर्व सदस्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले. आत्मसमर्पणानंतर मिळालेल्या संधीचा उपयोग करून नव्याने आयुष्य उभे करावे, समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे, असा संदेश देत त्यांनी सर्वांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. पोलीस अधीक्षकांच्या या संवादामुळे निरोपाचा क्षण आणखी भावूक झाला. गडचिरोलीतून त्यांना निरोप देताना एक वेगळाच विरोधाभास जाणवला—ज्या जंगलातून ते कधीकाळी संघर्षाच्या वाटेवर निघाले होते, त्याच गडचिरोलीतून आता ते शांत आयुष्याच्या दिशेने परतीचा प्रवास करत आहेत.

महत्त्वाचे वळण

शस्त्राच्या वाटेवरून स्वगृहाच्या उंबरठ्यापर्यंतचा हा प्रवास केवळ ५० व्यक्तींची घरवापसी नाही; तर आत्मसमर्पणानंतरच्या पुनर्वसनाला मिळालेल्या मानवी चेहऱ्याची ही नवी कहाणी आहे. नक्षलवादाची वाट सोडून मुख्य प्रवाहात परतलेल्या या माजी सदस्यांसाठी गडचिरोली आता केवळ आत्मसमर्पणाचे ठिकाण राहिलेले नाही; तर नव्या आयुष्याकडे पाठविणारे एक महत्त्वाचे वळण ठरत आहे.