गडचिरोली : जिल्ह्यात प्रस्तावित विमानतळ, औद्योगिक व अन्य विकास प्रकल्पांसाठी सुरू असलेल्या जमीन अधिग्रहण प्रक्रियेविरोधात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता थेट देशाच्या उपराष्ट्रपतींकडे धाव घेतली आहे. महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वाखाली सहा खासदारांच्या शिष्टमंडळासह शेतकरी प्रतिनिधींनी उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन जिल्ह्यातील कोणत्याही प्रकल्पासाठी सुपीक शेतीजमिनी अधिग्रहित करू नयेत, अशी मागणी केली.
शिष्टमंडळाने उपराष्ट्रपतींसमोर मांडलेल्या निवेदनात, गडचिरोलीला ‘स्टील हब’ म्हणून विकसित करण्याच्या प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर सुपीक शेतीजमिनी संपादित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा दावा करण्यात आला. शेती हेच हजारो कुटुंबांचे प्रमुख उपजीविकेचे साधन असून जमीन गेल्यास अनेक शेतकरी भूमिहीन होण्याबरोबरच त्यांच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्न निर्माण होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
गडचिरोली तालुक्यातील हिरापूर–गुरुवळा परिसरात प्रस्तावित विमानतळासाठी तसेच चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील १४ गावे आणि जयरामपूर परिसरातील १३ गावांमध्ये प्रस्तावित औद्योगिक व एमआयडीसी प्रकल्पांसाठी होणाऱ्या जमीन अधिग्रहणाला स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असल्याचेही शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले. या प्रश्नावर यापूर्वी शेतकऱ्यांनी निवेदने, मोर्चे, धरणे आणि मुंडन आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची मुंबईतील लोकभवन येथे भेट घेऊन जमीन अधिग्रहणाचे आदेश मागे घेण्याची मागणीही करण्यात आली होती. त्यानंतर आता हा प्रश्न उपराष्ट्रपतींसमोर मांडण्यात आला.
पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा
शिष्टमंडळाने गडचिरोली हा पेसा कायद्यांतर्गत संरक्षित जिल्हा असल्याचे सांगत, ग्रामसभांना विशेष अधिकार असतानाही त्यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप केला. ग्रामसभांच्या निर्णयाचा सन्मान राखून पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि या प्रकरणात हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी उपराष्ट्रपतींकडे केली.
शिष्टमंडळ
या शिष्टमंडळात खासदार प्रतिभा धानोरकर, वर्षा गायकवाड, श्यामकुमार बर्वे, प्रशांत पडोळे, गोवाल पाडवी आणि सलंग ए. सदमा यांचा समावेश होता. महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वाखाली मनोहर पोरेटी, ॲड. दुष्यंत कीरसान, दिवाकर निसार, प्रमोद भगत, मिलिंद खोब्रागडे, प्रशांत कोराम, वसंत राऊत, राजेश ठाकूर, नेताजी गावतुरे, अनिल कोठारे, धिवरू मेश्राम, विकास जेंगठे, मारुती कांबळे, रवी बोदलकर, निकेश तुंकलवार, साईनाथ चलाख, सुनील कोहपरे, भक्तदास भगत, मनोज दहेलकर, गुरुदास ठुसे, वसंत बुर्णवार, तात्याजी चिचघरे, गुरुदास ठाकरे, विजय निकुरे, विजय लाड, नदीम नाथानी, विपुल एलटीवार यांच्यासह जिल्ह्यातील अनेक शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
