गडचिरोली : कृषी विभागामार्फत गडचिरोलीतून युरोप, इस्राइल, जपान अशा देशांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात येणाऱ्या शेतकरी अभ्यास दौऱ्याची निवड प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. निवडलेल्या पाच जणांमध्ये दोन राजकीय पदाधिकारी आणि एका राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त व्यक्तीचा समावेश असल्याने, हा अभ्यास दौरा आहे की ‘मर्जीतील’ व्यक्तींना शासकीय खर्चाने घडवून आणलेली परदेश सहल आहे, असा संतप्त सवाल उपस्थित झाला आहे.

या संपूर्ण प्रक्रियेवर आक्षेप घेत महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कुणाल पेंदोरकर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयातही निवेदन सादर करण्यात आले असून, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली आहे.

पेंदोरकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, कृषी विभागाने या दौऱ्यासाठी प्रगतशील शेतकऱ्यांची निवड केल्याचा दावा केला आहे. मात्र, हे निकष कोणी, कसे व कधी ठरवले, हाच मूळ प्रश्न आहे. शेतीत अभिनव प्रयोग करणाऱ्या किंवा कृषी विभागानेच गौरविलेल्या खऱ्या शेतकऱ्यांऐवजी, एका सत्ताधारी पक्षाशी संबंधित संस्थाचालक, एक राजकीय पदाधिकारी आणि नाट्य क्षेत्रातील योगदानासाठी देशाचा चौथा मानाचा पुरस्कार मिळवलेल्या व्यक्तीला प्रगतशील शेतकरी म्हणून कृषी विभागाने कोणत्या आधारावर प्रमाणपत्र दिले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

विशेष म्हणजे, जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांना या निवड प्रक्रियेपासून पूर्णतः अंधारात ठेवण्यात आले, असा गंभीर आरोपही पेंदोरकर यांनी केला आहे. यामुळे संपूर्ण निवड प्रक्रियाच संशयास्पद बनली आहे. आदिवासीबहुल व अतिदुर्गम अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातून निवडलेल्या पाच जणांमध्ये एकाही सामान्य, गरीब किंवा आदिवासी शेतकऱ्याचे नाव नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांच्या नावाखाली राजकीय पदाधिकारी व संस्थाचालकांना परदेशात पाठवण्याचा हा घाट जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनीच घातला आहे, असा थेट आरोप पेंदोरकर यांनी निवेदनात केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून ही वादग्रस्त निवड यादी रद्द करावी व हिरळकर यांना निलंबित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्याशी संपर्क केला असता, अशी तक्रार आली असेल तर त्याबद्दल माहिती घेतली जाईल. याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना विचारणा करून चौकशी केली जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

जिल्ह्यातून विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड झालेले पुरस्कार प्राप्त शेतकरी आहेत. सर्व बाबी तपासूनच त्यांची निवड करण्यात आली आहे. कुणाला शंका असल्यास निवड प्रक्रियेची संपूर्ण चित्रफित आमच्याकडे आहे, ती ते बघू शकतात. प्रीती हिरळकर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी