गडचिरोली : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीत अनेक दुर्गम गावांचा संपर्क तुटलेला असतानाच लाहेरी येथील एका ३५ वर्षीय युवकाचा जीव वाचवण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांनी वेळेशी स्पर्धा करत हेलिकॉप्टरच्या साहाय्याने केलेल्या तातडीच्या वैद्यकीय स्थलांतरामुळे त्याला नवजीवन मिळाले.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे इंद्रावती, पामुलगौतम आणि पर्लकोटा नद्यांना पूर आला असून भामरागड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अशा परिस्थितीत लाहेरी येथील रहिवासी शामसुंदर नरोटी (वय ३५) यांची विषबाधा अथवा सर्पदंशामुळे प्रकृती गंभीर झाल्याची माहिती शुक्रवारी प्रशासनाला मिळाली. रस्ते बंद असल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी हलविणे शक्य नव्हते.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने गडचिरोली पोलिसांशी समन्वय साधला. त्यानंतर गडचिरोली पोलिसांच्या सेवेत असलेले पवन हंसचे हेलिकॉप्टर तातडीने भामरागडकडे रवाना करण्यात आले. दुर्गम भागातून शामसुंदर नरोटी यांना सुरक्षितपणे बाहेर काढून हेलिकॉप्टरने गडचिरोली येथे आणण्यात आले. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असून ते धोक्याबाहेर असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

या घटनेनंतर पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी नागरिकांना आवाहन करताना, आपत्कालीन परिस्थितीत अंधश्रद्धेला बळी न पडता तातडीने जवळच्या रुग्णालयाशी किंवा आपत्कालीन यंत्रणांशी संपर्क साधावा, असे सांगितले. वेळेत उपचार मिळाल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात, असेही त्यांनी नमूद केले.

ही संपूर्ण बचाव आणि वैद्यकीय स्थलांतराची मोहीम गडचिरोली पोलीस, जिल्हा प्रशासन, भामरागड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, भामरागड पोलीस ठाणे, महसूल विभाग तसेच पवन हंसचे वैमानिक अरविंद सैनी आणि राजीव शर्मा यांच्या समन्वयातून यशस्वीपणे पार पडली. पुरामुळे वेढलेल्या दुर्गम भागातील नागरिकांसाठी ही कारवाई प्रशासनाच्या तत्परतेचे आणि आपत्कालीन यंत्रणेच्या सज्जतेचे आणखी एक उदाहरण ठरली.