गडचिरोली : बुधवारी मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून भामरागड तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील अनेक नद्या-नाले दुथडी भरून वाहत असल्याने २४ प्रमुख मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. भामरागडमध्ये पूरग्रस्त भागातील ७०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून, त्यांची आश्रमशाळा व इतर सुरक्षित ठिकाणी निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
भामरागड तालुक्यात पामुलगौतम नदीसह परिसरातील नाल्यांना अचानक पूर आल्याने अनेक भागांचा संपर्क तुटला. आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने रात्रभर बचावकार्य राबवत पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढले. यामध्ये एका कुटुंबातील लहान मुलांसह चार जणांची रात्री सुटका करण्यात आली, तर गुरुवारी सकाळी भामरागड शहरातील आणखी ४५ जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन आणि दिलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत एकूण ७०० हून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. जिल्ह्यातील अहेरी, नागेपल्ली, मुलचेरा आलापल्ली आणि गडचिरोली शहरात सखल भागामध्ये पाणी साचले असून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, वाढत्या पाण्याच्या पार्श्वभूमीवर गोसीखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे उघडून १ लाख ३५ हजार ५९२ क्युसेक, चिचडोह धरणातून ९१ हजार क्युसेक, तर तेलंगणातील मेडिगड्डा प्रकल्पातून ८१ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.गेल्या चोवीस तासांत मुलचेरा तालुक्यात १६३.८ मिमी, गडचिरोली तालुक्यात १६३.७ मिमी, तर भामरागड मंडळात तब्बल २४१.७ मिमी पावसाची नोंद झाली. इंद्रावती नदीची पाणीपातळी धोक्याच्या पातळीवर पोहोचल्याने भामरागडमध्ये पूरस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
पूरामुळे गडचिरोली–धानोरा, आलापल्ली–भामरागड, कुरखेडा–वैरागड, कोरची–बोटेकसा, धानोरा–रांगी, कोरची–बेतकाठी, कुरखेडा–तळेगाव, रोमपल्ली–झिंगानूर, एटापल्ली–गट्टा आणि मुलचेरा–आलापल्ली या दहा प्रमुख मार्गांसह २४ मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे.
मदत व बचावकार्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी गडचिरोलीतील पूरस्थितीचा जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १२३ मिमी, तर काही भागांत २०० मिमीहून अधिक पाऊस झाल्याची माहिती त्यांना देण्यात आली. छत्तीसगडमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे भामरागडमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात एसडीआरएफचे पथक तैनात असून जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन समन्वयाने मदत व बचावकार्य राबवत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
