गडचिरोली : स्थापनेपासूनच विविध कारणांनी चर्चेत राहिलेल्या गडचिरोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनात अखेर मोठा बदल करण्यात आला आहे. अधिष्ठाता डॉ. अविनाश टेकाडे यांच्याकडे असलेला अतिरिक्त कार्यभार काढून चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. राजेंद्र सुरपाम यांच्याकडे गडचिरोलीच्या अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने १८ ऑगस्ट रोजी यासंदर्भातील आदेश काढला.
गडचिरोली वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यापासूनच प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. महाविद्यालयातील पायाभूत सुविधांपासून मनुष्यबळ, कंत्राटी भरती, विद्यार्थ्यांच्या सुविधा आणि रुग्णसेवेपर्यंत विविध मुद्यांवरून प्रशासन टीकेच्या केंद्रस्थानी राहिले. तात्पुरत्या व्यवस्थेसाठी झालेल्या विकासकामांमध्ये अनियमिततेचे आरोप झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. या वेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनीही नाराजी व्यक्त केली होती.
याच काळात जिल्हा रुग्णालयातील रुग्णसेवेवरून जिल्हा शल्यचिकित्सक आणि अधिष्ठाता यांच्यात पत्रव्यवहार झाला होता. २९ चिकित्सालयीन प्राध्यापकांच्या सेवेसंदर्भातील वादावरून जिल्हा शल्यचिकित्सकांनी अधिष्ठाता डॉ. टेकाडे यांच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवला होता. या प्रकरणाची प्रशासकीय वर्तुळातही चर्चा झाली. दरम्यान, जून २०२६ मध्ये आमदारांच्या पाहणीत मोठ्या संख्येने डॉक्टर अनुपस्थित असल्याचा आरोप करण्यात आला होता. रुग्णसेवेबाबत सातत्याने तक्रारी प्राप्त होत असल्याचेही त्यावेळी नमूद करण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर शासनाने आता अधिष्ठाता पदाची जबाबदारी बदलण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. सुरपाम यांनी चंद्रपूर येथील स्वतःच्या पदाची कर्तव्ये सांभाळून गडचिरोलीच्या अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेशापर्यंत सांभाळायचा आहे. महाविद्यालयाच्या सुरळीत प्रशासनासह रुग्णसेवा आणि वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचे मोठे आव्हान नव्या प्रभारी अधिष्ठात्यांसमोर राहणार आहे.
