गडचिरोली: ग्रामीण आणि आदिवासी भागातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जात असल्या, तरी लोह खाणीतून हजारो कोटींचा महसूल देणाऱ्या एटापल्ली तालुक्यातील गोटाटोला येथील विद्यार्थ्यांच्या वाट्याला मात्र आजही संघर्षच आला आहे. गावात शाळा नसल्याने येथील सुमारे ११ विद्यार्थ्यांना दररोज तीन किलोमीटरची जंगलवाट तुडवत सरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत जावे लागते. वन्यप्राण्यांच्या भीतीतही शिक्षणाची आस कायम ठेवणाऱ्या या चिमुकल्यांचा ‘वनवास’ कधी संपणार, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
सरखेडा ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या गोटाटोला गावाला स्वातंत्र्यानंतरही अनेक मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागल्याचे ग्रामस्थ सांगतात. रस्त्याची सुविधाही दीर्घकाळ उपलब्ध नव्हती. काही काळापूर्वी रस्ता नसल्याने एका गर्भवती महिलेला खाटेवरून नेण्याची वेळ आली होती. या घटनेची न्यायालयीन दखल घेतल्यानंतर सध्या रस्त्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येते. मात्र विद्यार्थ्यांचा शाळेपर्यंतचा प्रवास अद्यापही खडतर आहे.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांची भीती, तरीही शिक्षणाची ओढ
दररोज सकाळी दप्तर पाठीवर घेऊन ही मुले जंगलवाटेने सरखेड्याकडे निघतात. परतीच्या प्रवासातही त्यांना याच वाटेने जावे लागते. काही दिवसांपूर्वी या परिसरात वाघाच्या हालचाली तसेच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमुळे भीतीचे वातावरण होते. अशा परिस्थितीतही शिक्षणाची ओढ या मुलांना शाळेपर्यंत घेऊन जाते. पालकांसमोरही मोठे आव्हान आहे. बहुतांश कुटुंबांची उपजीविका रोजंदारी आणि शेतीवर अवलंबून असल्याने मुलांना रोज शाळेत सोडण्यासाठी पालकांना वेळ देणे शक्य होत नाही. त्यामुळे काळजी मनात ठेवून मुलांना जंगलाच्या वाटेने पाठवावे लागते.
‘साहेब, आम्हाला सुरक्षितपणे शाळेत जाण्याची सोय करा!’
“दररोज तीन किलोमीटर पायी चालत शाळेत जावे लागते. जंगलातून जाताना भीती वाटते. आमच्या येण्या-जाण्याची व्यवस्था करा किंवा गावातच शाळा सुरू करा,” अशी आर्त मागणी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. “मुलांना सोडायला आम्हाला आवडेल; मात्र आम्ही रोजंदारीवर गेलो नाही तर घरची चूल पेटणार नाही. त्यामुळे नाइलाजाने मुलांना एकट्याने पाठवावे लागते. शासनाने त्यांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीची व्यवस्था करावी,” अशी मागणी पालक जाणू कोल्हा यांनी केली. सामाजिक कार्यकर्ते मुकेश कावळे यांनी विद्यार्थ्यांसाठी तातडीने वाहतुकीची कायमस्वरूपी व्यवस्था करावी किंवा गावातच शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही प्रशासनाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
