गडचिरोली : मोठ्या संघर्षानंतर आणि अनेक वर्षांच्या मागणीनंतर गडचिरोलीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले. मात्र, स्थापनेपासूनच प्रशासकीय बदल, वाद आणि कारभारावरून निर्माण होणारे प्रश्न यामुळे या संस्थेची चर्चा सातत्याने सुरू आहे. प्रभारी अधिष्ठाता डॉ. टेकाडे यांच्या वादग्रस्त कारभाराच्या पार्श्वभूमीवर त्यांची उचलबांगडी झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी डॉ. राजेंद्र सुरपाम यांच्याकडे सोपविण्यात आलेली अधिष्ठातापदाची अतिरिक्त जबाबदारीही आता काढून घेण्यात आली आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनात पुन्हा एकदा मोठा बदल झाला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने १० सप्टेंबर २०२६ रोजी काढलेल्या आदेशानुसार, गडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. राजेंद्र सुरपाम यांच्याकडून काढून नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. मोहम्मद फैजल अ. सलीम यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत तात्पुरत्या स्वरूपात सोपविण्यात आला आहे.

डॉ. सुरपाम यांच्याकडील जबाबदारी इतक्या कमी कालावधीत का काढण्यात आली, याबाबत मात्र शासन आदेशात कोणतेही कारण नमूद करण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रशासकीय वर्तुळात या बदलाबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. डॉ. सुरपाम यांच्या कारभाराबाबतही काही तक्रारी किंवा प्रशासकीय कारणांमुळे हा निर्णय झाला का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, याबाबत अधिकृतपणे कुठलेही कारण अद्याप समोर आलेली नाही.

वैद्यकीय महाविद्यालय नेमके कुणासाठी?

गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि आदिवासीबहुल जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, स्थानिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळावी आणि जिल्ह्यातील नागरिकांना उपचारांसाठी मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागू नये, या उद्देशाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी मोठा संघर्ष झाला. त्यामुळे या संस्थेकडून जिल्हावासीयांच्या अपेक्षाही मोठ्या आहेत.

मात्र, गेल्या काही काळातील प्रशासकीय घडामोडी पाहता वैद्यकीय महाविद्यालयाचा मूळ उद्देश बाजूला पडून अधिकारी आणि प्रशासनातील अंतर्गत संघर्ष, आरोप-प्रत्यारोप आणि अन्य प्रशासकीय बाबींनाच अधिक महत्त्व मिळत असल्याची भावना व्यक्त होत आहे. यापूर्वी महाविद्यालयातील विकासकामे, मूलभूत सुविधांची कमतरता आणि कामांच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न उपस्थित झाले होते. २८ कोटी रुपयांच्या विकासकामांमधील कथित अनियमितता आणि निकृष्ट कामांबाबत तक्रारी झाल्यानंतर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी पाहणी करून चौकशीचे आदेश दिल्याचेही यापूर्वी समोर आले होते. अशा पार्श्वभूमीवर आता पुन्हा प्रभारी अधिष्ठात्याची जबाबदारी बदलल्याने लोकप्रतिनिधींना आणि प्रशासनाला या संस्थेच्या कारभाराबाबत स्पष्टीकरण द्यावे लागण्याची शक्यता आहे. विशेषतः जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालय मिळवून देण्यासाठी झालेल्या दीर्घ संघर्षानंतरही संस्थेचे प्रशासन स्थिर का होत नाही, हा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे.

नवीन प्रभारी अधिष्ठाता डॉ. मोहम्मद फैजल अ. सलीम यांच्याकडे स्वतःच्या पदाची कर्तव्ये सांभाळतानाच गडचिरोलीच्या अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. आता त्यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाचा कारभार स्थिरावतो का आणि रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण तसेच पायाभूत सुविधांच्या प्रश्नांना प्राधान्य मिळते का, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.