गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील हालेवारा ग्रामसभेने ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या आदिवासींची भारतीय जनगणनेत स्वतंत्र नोंद करावी आणि त्यांना अनुसूचित जमातींसाठी असलेले आरक्षण व शासकीय लाभ बंद करावेत, अशी मागणी केली आहे. संदर्भात राज्यपाल, मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री, जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या मागणीमुळे आदिवासी समाजातील धर्मांतराच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
हालेवारा हे शंभर टक्के आदिम माडिया जमातीचे गाव असल्याचा दावा ग्रामसभेने निवेदनात केला आहे. गावातील काही नागरिकांनी गेल्या काही वर्षांत ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचे नमूद करत ग्रामसभेने याबाबत शासनाने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे. धर्मांतरासाठी आमिषे दाखविणे, पारंपरिक श्रद्धा व रितीरिवाजांपासून आदिवासी समाजाला दूर नेण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
धर्मांतर केलेल्या व्यक्तींना अनुसूचित जमातींचे दाखले, जात प्रमाणपत्र, शासकीय योजना, शैक्षणिक सवलती आणि नोकरीतील आरक्षणाचा लाभ मिळत असल्याने मूळ आदिवासी समाजावर अन्याय होत असल्याची भावना ग्रामसभेने व्यक्त केली आहे. त्यामुळे धर्मांतरितांची स्वतंत्र नोंद करून त्यांना आरक्षणाच्या कक्षेबाहेर ठेवावे, अशी मागणी ग्रामसभेने केली आहे.
यासोबतच गावातील धर्मांतराच्या घटनांची चौकशी करण्यासाठी विशेष समिती नेमावी, संबंधितांची तपासणी करून शासनाला अहवाल सादर करावा आणि बेकायदेशीर धर्मप्रसारावर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. ग्रामसभेने संविधानातील पेसा कायदा, अनुसूचित क्षेत्रांतील ग्रामसभांना असलेले अधिकार आणि आदिवासी स्वायत्ततेचा उल्लेख करत आदिम माडिया समाजाची पारंपरिक सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी शासनाने हस्तक्षेप करावा, असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर ग्रामसभेतील पदाधिकारी व नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असून संबंधित विभागांना त्याच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत.
