गडचिरोली : विदर्भात सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून, गडचिरोली जिल्ह्याचा पारा ४४ अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. या कडाक्याच्या उन्हाचा फटका केवळ मानवी जीवनालाच नाही, तर आता तांत्रिक यंत्रणेलाही बसू लागला आहे. वाढत्या उष्णतेमुळे ट्रान्सफार्मरचेही तापमान वाढल्याने अल्लापल्ली येथील उपकेंद्रात यंत्रणेला थंड ठेवण्यासाठी चक्क कुलर लावण्याची वेळ महावितरणवर आली आहे.
वाढता भार आणि तांत्रिक पेच
उन्हाळ्याच्या दिवसात शीतकरण यंत्रांचा वापर वाढल्याने विजेची मागणी उच्चांकी पातळीवर पोहोचते. अल्लापल्ली येथील १३२ केव्ही उपकेंद्रावर सध्या प्रचंड ताण आहे. वाढत्या लोडमुळे ट्रान्सफार्मरमधील तेल गरम होते, त्यातच बाहेरचे तापमान ४४ अंशांवर पोहोचल्याने यंत्रणेवर दुहेरी मारा होत आहे. ट्रान्सफॉर्मर मर्यादेपेक्षा जास्त तापल्यास त्यात तांत्रिक बिघाड होऊन स्फोट होण्याची किंवा वीज पुरवठा दीर्घकाळ ठप्प होण्याची भीती असते. ही आपत्कालीन स्थिती टाळण्यासाठी महावितरण आणि महापारेषणच्या कर्मचाऱ्यांनी ही ‘थंडावा’ देणारी शक्कल लढवली आहे.
यंत्रणेसाठी ‘कुलर’ कवच
येथील मुख्य ट्रान्सफार्मरला (डीपी) ओव्हरहिटिंगपासून वाचवण्यासाठी त्याच्या दोन्ही बाजूंना मोठे लोखंडी कुलर बसवण्यात आले आहेत. या कुलरच्या माध्यमातून सतत थंड हवा सोडून यंत्रणेचे तापमान नियंत्रित राखण्याचा प्रयत्न केला जात आहे. माणसांप्रमाणेच आता यंत्रांनाही कुलरचा आधार घ्यावा लागत असल्याने विदर्भातील उन्हाच्या तीव्रतेची भीषणता अधोरेखित होत आहे.
नागरिकांच्या संतापावर उतारा
ऐन उन्हाळ्यात वीज पुरवठा खंडित झाल्यास नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. तांत्रिक बिघाडामुळे होणारा संभाव्य वीजपुरवठा खंडित होऊ नये आणि कोट्यवधी रुपयांची यंत्रणा सुरक्षित राहावी, यासाठी ही खबरदारी घेण्यात येत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. भर उन्हात ट्रान्सफार्मरला कुलर लावून दिला जाणारा हा ‘थंडावा’ सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
