गडचिरोली : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली असून राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) आणि पोलीस प्रशासनाच्या पथकांनी विविध ठिकाणी जीव धोक्यात घालून बचावकार्य राबवत अनेकांना सुरक्षितस्थळी हलविले. नोकरीसाठी रुजू होण्यासाठी निघालेला युवक, परीक्षेसाठी जाणारी विद्यार्थिनी, आजारी नागरिक तसेच पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या कारमध्ये अडकलेले वनपरिक्षेत्राधिकारी यांना वेळेत मदत मिळाल्याने मोठी जीवितहानी टळली.
आष्टी-मुलचेरा मार्गावरील रेंगेवाही नाल्याच्या पुलावर गुरुवारी पेडीगुडमचे वनपरिक्षेत्राधिकारी अजहर पठाण यांची कार पुराच्या पाण्यात वाहून गेली. कार एका झाडाला अडकल्याने ते त्यातच अडकून पडले होते. घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विशाल काळे यांच्या नेतृत्वाखालील बचाव पथकाने धाडसी मोहीम राबवत त्यांना सुरक्षित बाहेर काढले.
गडचिरोली तालुक्यातील कुंभी गावाचा संपर्क पूर्णपणे तुटल्याने अनेक नागरिक अडकून पडले होते. राजस्थानमध्ये बँक व्यवस्थापक म्हणून नियुक्ती झालेल्या समीर विजय गेडाम (२५) यांना रुजू होण्यासाठी बाहेर पडणे आवश्यक होते. तसेच तुलसी नवबोध गेडाम (२१) हिला नागपूर येथे परीक्षा देण्यासाठी पोहोचायचे होते. जिल्हा प्रशासनाने एसडीआरएफ आणि पोलिसांच्या मदतीने दोघांनाही बोटीद्वारे सुरक्षित बाहेर काढून पुढील प्रवासाची व्यवस्था केली. प्रकृती अस्वस्थ असलेले दिलीप पितांबर गेडाम (५०) यांनाही पुरातून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही मोहीम गडचिरोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनोद चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वी केली.
भामरागड तालुक्यातही एसडीआरएफ आणि पोलिसांनी सलग बचावमोहीम राबविली. २९ जुलैच्या रात्री पुरात अडकलेल्या ४५ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेता सिरोंचा, भामरागड आणि गडचिरोली येथे एसडीआरएफची प्रत्येकी एक तुकडी तैनात करण्यात आली आहे.
भरपावसात १७ किलोमीटर स्ट्रेचरवरून रुग्णाला उपचारासाठी
भामरागड तालुक्यातील बिनागुंडा येथील पोरिया गग्गू तिम्मा याच्यावर अस्वलाने हल्ला करून गंभीर जखमी केले. रात्री प्राथमिक उपचार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस, पूर आणि वाहतुकीची कोणतीही सुविधा नसतानाही आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याला तब्बल १७ किलोमीटर स्ट्रेचरवरून पायपीट करत गुंडेनूर नाला ओलांडून लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचविले. तेथून पुढील उपचारासाठी त्याला भामरागड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. वेळेत उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचले.
दरम्यान, पामुलगौतम नदी व परिसरातील नाल्यांना आलेल्या पुरामुळे लाहेरी येथील एकाच कुटुंबातील तीन जण नदीच्या मधोमध अडकले होते. एसडीआरएफच्या जवानांनी बचावमोहीम राबवून नवी केये कुडयामी (४०), अर्पणा केये कुडयामी (१६) आणि अक्षरा केये कुडयामी (३) या तिघांना सुखरूप बाहेर काढले. जिल्ह्यातील पूरपरिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि पूरग्रस्त भागात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
