गडचिरोली : जिल्ह्यात मंगळवार रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने बुधवारी अक्षरशः हाहाकार माजविला. अनेक भागांत नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागल्याने पूरस्थिती निर्माण झाली असून, अनेक रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. शहरांसह ग्रामीण भागातील सखल वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आकडेवारीनुसार, गुरुवारी सकाळपर्यंत जिल्ह्याची सरासरी १२३.५ मिमी पावसाची नोंद झाली असून, भामरागड मंडळात सर्वाधिक २४१.७ मिमी पाऊस कोसळला आहे.

जिल्ह्यातील ४५ पैकी ४४ महसूल मंडळांची पर्जन्यमानाची नोंद उपलब्ध झाली असून, एकूण २१ मंडळांत अतिमुसळधार, १८ मंडळांत मुसळधार तर भामरागड, मुलचेरा (२१७.६ मिमी) आणि पेंढरी-धानोरा (२१० मिमी) या तीन मंडळांत अतिअतिमुसळधार पावसाची नोंद झाली. तालुकानिहाय मुलचेरा (१६३.८ मिमी), गडचिरोली (१६३.७ मिमी), धानोरा (१६१.६ मिमी) आणि अहेरी (१३६.३ मिमी) येथे सर्वाधिक सरासरी पाऊस झाला.

आरमोरी तालुक्यात निसर्गाचे रौद्ररूप पाहायला मिळत आहे. सती नदीला आलेल्या पुरामुळे कढोली-वैरागड मार्ग बंद झाला आहे. कठाणी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने पुराचे पाणी थेट राजोली गावात शिरले. अनेक घरांमध्ये पाणी साचल्याने संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले असून नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.

गडचिरोली शहरातही मुसळधार पावसामुळे अनेक भागांना तळ्याचे स्वरूप आले. सखल भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. कन्नमवार वॉर्ड जलमय झाला असून, समूह गटसाधन केंद्राचे संपूर्ण आवार पाण्याखाली गेले आहे. गणेशनगर, गोकुळनगरसह विविध भागांतील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांची रात्री तारांबळ उडाली. सकाळी नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाने तातडीने मोहीम हाती घेत रस्त्यांवरील साचलेले पाणी, दगड, गोटे आणि कचरा हटविण्याचे काम सुरू केले.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन गडचिरोली तालुक्यातील सर्व अंगणवाड्या, शाळा आणि महाविद्यालयांना ३० जुलै रोजी सुटी जाहीर करण्यात आली. मात्र, आदेश उशिरा पोहोचल्याने काही विद्यार्थी सकाळीच शाळेत पोहोचले. त्यानंतर त्यांना परत घरी पाठवावे लागल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

जिल्ह्यातील सर्व प्रमुख नद्या आणि लहान-मोठे नाले दुथडी भरून वाहत असल्याने प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी नदी-नाल्यांजवळ जाणे टाळावे, पूरग्रस्त मार्गांचा वापर करू नये तसेच अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.