गडचिरोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शनिवारी जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात गडचिरोली जिल्ह्याचा टक्का घसरला असून नागपूर विभागात यंदाही जिल्ह्याची कामगिरी सर्वात सुमार ठरली. जिल्ह्याचा सरासरी निकाल ७९.६३ टक्क्यांवर स्थिरावला आहे. मात्र, जिल्ह्याच्या या घसरलेल्या आलेखातही मुलींनी पुन्हा एकदा आपली गुणवत्तेची मोहोर उमटवत मुलांच्या तुलनेत वरचष्मा राखला आहे.

यंदाच्या परीक्षेत जिल्ह्यातील मुलींनी सातत्य राखत यशाचे शिखर गाठले. जिल्ह्यातून एकूण १२ हजार ४७० विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले होते, त्यापैकी ९ हजार ९३१ जण उत्तीर्ण झाले. यामध्ये ५ हजार २७५ मुलींनी यश संपादन केले असून, उत्तीर्णतेच्या बाबतीत त्यांनी मुलांना मागे टाकले आहे. निकालाची आकडेवारी पाहता, जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींच्या यशाची टक्केवारी १० ते १५ टक्क्यांनी अधिक आहे.

तालुकानिहाय कामगिरीचा आढावा घेतल्यास, दुर्गम भागातील कोरची तालुक्याने ८९.७८ टक्क्यांसह जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यापाठोपाठ मुलचेरा (८८.३७%) आणि धानोरा (८७.२६%) या तालुक्यांनी आपली चमक दाखवली. मात्र, दुसरीकडे अतिदुर्गम एटापल्ली तालुक्याचा निकाल जेमतेम ६१.६३ टक्के लागल्याने जिल्ह्याच्या सरासरीवर त्याचा परिणाम झाला आहे. शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेने ९५.११ टक्क्यांसह आपले वर्चस्व कायम राखले असले, तरी कला (६८.४५%) आणि वाणिज्य (६६.६६%) शाखांच्या निकालात मोठी घट पाहायला मिळाली.

नागपूर विभागातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोलीची पिछाडी चिंतेचा विषय ठरत आहे. २०२४ मध्ये ९४.४२ टक्क्यांवर असलेला जिल्ह्याचा निकाल गेल्या तीन वर्षांत सातत्याने घसरत आता ७९.६३ टक्क्यांवर पोहोचला आहे. विभागातील नागपूर, गोंदिया आणि चंद्रपूर यांसारख्या जिल्ह्यांनी ८५ टक्क्यांच्या पुढे मजल मारलेली असताना गडचिरोलीला मात्र शेवटच्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. दरम्यान, अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि गुणसुधारासाठी मंडळाने जून-जुलै २०२६ मध्ये पहिली संधी उपलब्ध करून दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी किंवा उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीची आवश्यकता आहे, त्यांना ३ ते १७ मे या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. एकीकडे मुलींनी मिळवलेले यश कौतुकास्पद असले, तरी जिल्ह्याचा घसरलेला टक्का सुधारण्याचे मोठे आव्हान शिक्षण विभागासमोर उभे ठाकले आहे.