गडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा-सिंड्राई घाटावर अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या गंभीर घटनेनंतर अखेर जिल्हा प्रशासनाने महसूल यंत्रणेवर कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी संबंधित मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना तात्काळ निलंबित केले असून, देसाईगंजच्या तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्त, नागपूर यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे पाठविला आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
कोंढाळा येथील वैणगंगा नदी परिसरात विलास महादेव ढकले (वय ३६, रा. जिल्हेवाडा, ता. देसाईगंज) हे ट्रॅक्टरने अवैध वाळू वाहतूक करत असताना ट्रॅक्टर पलटी होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने जिल्हा भरारी पथक नियुक्त करून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
बंदीनंतरही अवैध उत्खनन
भरारी पथकाच्या स्थळ पाहणी अहवालासह उपविभागीय अधिकारी, देसाईगंज यांनी सादर केलेल्या अहवालात धक्कादायक बाबी समोर आल्या. १० जूननंतर संबंधित वाळू घाटावरील उत्खनन पूर्णपणे बंद करण्याचे स्पष्ट आदेश असतानाही त्या ठिकाणी सर्रास अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याचे निष्पन्न झाले. एवढेच नव्हे, तर या अवैध प्रकारांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या स्थानिक महसूल यंत्रणेने आवश्यक ती दक्षता न घेतल्याचेही चौकशीत स्पष्ट झाले.
तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे
या निष्कर्षांच्या आधारे संबंधित क्षेत्राच्या मंडळ अधिकारी अर्चना टिस्कुले आणि तलाठी महादास ठाकरे यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. तसेच प्रशासकीय जबाबदारी निश्चित करत देसाईगंजच्या तहसीलदार प्रिती डुढलकर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्त, नागपूर यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली.
कायद्याची कठोर अंमलबजावणी करा
जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीला कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही. अशा प्रकारांना थारा देणारे किंवा कारवाईत कसूर करणारे अधिकारी-कर्मचारी कोणत्याही परिस्थितीत वाचणार नाहीत. जिल्ह्यातील सर्व महसूल व संबंधित यंत्रणांनी अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण ठेवून कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
