गडचिरोली : गुरांच्या तस्करीच्या गुन्ह्यातून जामिनावर सुटताच त्याच दिवशी मित्रांच्या मदतीने सराफा व्यावसायिकाला लुटण्याचा कट रचल्याचा प्रकार समोर आला आहे. चामोर्शी मार्गावरील जंगल कामगार सोसायटीच्या कार्यालयासमोर सराफा व्यावसायिकाच्या डोळ्यांत लाल रंगाची पावडर फेकून सुमारे अर्धा किलो दागिने लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांपैकी तिघांना पोलिसांनी अवघ्या एका दिवसात अटक केली. चौथा आरोपी फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.

सुरेश बाबुराव भोजापुरे (५०, रा. गोकुळनगर) हे ३१ ऑगस्ट रोजी रात्री घरी जात असताना जंगल कामगार सोसायटीसमोर दुचाकींवरून आलेल्या आरोपींनी त्यांच्या डोळ्यांत लाल पावडर फेकली. त्यांच्याकडील दागिने लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींच्या हाती दागिन्यांऐवजी त्यांचा जेवणाचा डबा लागला. भोजापुरे यांनी आरडाओरड केल्याने आरोपींनी तेथून पळ काढला.

या घटनेनंतर भोजापुरे यांच्या तक्रारीवरून गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखा आणि गडचिरोली पोलिसांच्या पथकांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तसेच तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला. त्यातून विशाल घनश्याम देशमुख (३६, रा. रामनगर), राकेश विजय गिरसावळे (३५, रा. कन्नमवारनगर) आणि शहबाज सलाम शेख (३१, रा. विवेकानंदनगर) यांना अटक करण्यात आली. त्यांचा साथीदार सोनू खांडेकर (२४, रा. विवेकानंदनगर) हा फरार आहे.

शहबाज शेख याला आरमोरी पोलिसांनी गुरांच्या तस्करीच्या गुन्ह्यात अटक केली होती. ३१ ऑगस्ट रोजीच तो जामिनावर बाहेर आला. त्यानंतर झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासातून त्याने साथीदारांसह भोजापुरे यांना लुटण्याचा कट आखल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
२९ ऑगस्ट रोजीही सराफा व्यावसायिक नितीन खेवले यांना शिवाजी महाविद्यालयाच्या वळणावर अशाच पद्धतीने लुटण्याचा प्रयत्न झाला होता. या घटनेतही आरोपींचा सहभाग आहे का, याचा पोलिस तपास करीत आहेत. चौकशीतून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पाच दिवसांची पोलीस कोठडी

अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना २ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी ही माहिती दिली.

पाळत ठेवून पाठलाग; मदतीचा बहाणा

लुटीच्या प्रयत्नापूर्वी चौघांनी सराफा बाजारात सुमारे अर्धा तास भोजापुरे यांच्यावर पाळत ठेवली होती. त्यानंतर दोन दुचाकींवरून त्यांचा पाठलाग करण्यात आला. लुटीचा प्रयत्न फसल्यानंतर आरोपींपैकी दोघांनी भोजापुरे यांना धीर देण्याचा बहाणा केला आणि त्यांना घरी सोडले. ‘दागिने सुरक्षित आहेत, मग पोलिसांत तक्रार कशाला करता?’ असे सांगून त्यांना तक्रार न करण्याचा सल्लाही दिल्याचे तपासात समोर आले आहे.