गडचिरोली : लैंगिक अत्याचारासारख्या संवेदनशील प्रकरणातील पीडितेची ओळख गोपनीय ठेवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कडक मार्गदर्शक सूचना असतानाही, त्याचे उल्लंघन करणे एका कथित पत्रकाराला चांगलेच महागात पडले आहे. पीडितेचा फोटो आणि तिची ओळख सार्वजनिक केल्याच्या आरोपावरून गडचिरोली पोलिसांनी २ मे रोजी कैलाश शर्मा (रा. सर्वोदय वॉर्ड, गडचिरोली) या पत्रकाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील माध्यम वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणाची पार्श्वभूमी गुंतागुंतीची असून, पीडितेसह अन्य दोघांवर एका तरुणाकडून खंडणी मागितल्याप्रकरणी आधी गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र, त्यानंतर संबंधित महिलेने आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार दिल्याने पोलिसांनी त्या प्रकरणाचाही गुन्हा दाखल केला होता. कायदेशीर प्रक्रियेनुसार, पीडितेची वैद्यकीय तपासणी आणि उपचारांसाठी तिला जिल्हा महिला व बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पीडित महिला रुग्णालयात उपचार घेत असतानाच, तिच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याची बातमी देताना कैलाश शर्मा याने स्वतःच्या न्यूज पोर्टलवर तिचा फोटो प्रसिद्ध केला. ही बातमी आणि फोटो समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल झाल्यामुळे पीडितेची ओळख सार्वजनिक झाली आणि तिला मोठ्या प्रमाणावर सामाजिक बदनामीला सामोरे जावे लागले.
रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर पीडितेने थेट गडचिरोली पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी फिर्याद दिली. मूळ अत्याचार प्रकरणातील आरोपींच्या कुटुंबीयांकडून आर्थिक लाभ घेऊन किंवा त्यांच्या दबावाखाली येऊन आपली बदनामी करण्यासाठीच पत्रकाराने हे कृत्य केल्याचा गंभीर आरोप पीडितेने केला आहे. या कृत्यामुळे आपल्याला प्रचंड मानसिक त्रास झाल्याचेही तिने तक्रारीत नमूद केले आहे.
पीडितेच्या या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी कैलाश शर्मा याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलम ७२ (१) नुसार गुन्हा दाखल केला आहे. लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातील पीडितेची ओळख कोणत्याही स्वरूपात उघड करणे हा कायद्याने गंभीर अपराध मानला जातो. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भावना राऊत करत आहेत. संवेदनशील गुन्ह्यांचे वृत्तांकन करताना जबाबदारीचे भान न राखल्यास कायद्याचा बडगा उगारला जाऊ शकतो, हेच या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
