गडचिरोली: अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या पतीचा अत्यंत क्रूरपणे काटा काढून त्याचा मृतदेह जंगलात पुरल्याची धक्कादायक घटना कोरची परिसरात उघडकीस आली आहे. कोणतेही धागेदोरे उपलब्ध नसताना, केवळ गुप्त माहिती व सूक्ष्म तपासाच्या आधारे कोरची पोलिसांनी ७२ तासांच्या आत या हत्याकांडाचा छडा लावत पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. यामध्ये मृताच्या पत्नीसह तिच्या प्रियकराचा समावेश आहे.

३१ जानेवारी २०२५ रोजी कोरची पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोगाटोला गावानजीकच्या जंगलात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. अंदाजे ३० ते ३५ वयोगटातील या तरुणाची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जमिनीत पुरण्यात आला होता. मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता, डोक्यावर आणि मानेवर धारदार शस्त्राने वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

अनैतिक संबंधांतून रचला कट

मृतदेहाचा चेहरा पूर्णतः विद्रूप झाल्याने ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. घटनास्थळी सापडलेली एक रिकामी गोणी आणि मृतदेह पुरण्यासाठी वापरण्यात आलेले खोदकाम साहित्य यावरून पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली. गोपनीय तपासादरम्यान २० जानेवारी रोजी जांभुळखेडा येथील काही तरुण खोदकामाचे साहित्य घेऊन या परिसरात फिरत होते. या माहितीवरून पोलिसांनी शालू पठाण याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान संशय बळावल्याने पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने सर्व कबूल केले व या हत्याकांडाचा उलगडा झाला.

पत्नीने केला घात

शालू पठाण याचे छत्तीसगडमधील डोंगरगड येथील सोनाली कंवर (२५) या विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, सोनालीचा पती जितू कंवर (३०) हा त्यांच्या संबंधांत अडथळा ठरत होता. त्यामुळे जितूचा कायमचा काटा काढण्याचा कट या दोघांनी रचला. ठरलेल्या प्लॅननुसार, सोनाली आपल्या पतीसह सासरी जात असताना तिने शालू पठाण याला माहिती दिली. शालूने आपल्या पुंकेश बोरकर, चंद्रशेखर गुज्जेवार आणि धनपाल मडावी या मित्रांच्या मदतीने बोगाटोला जंगलाजवळ गाडी थांबवून जितूवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्याचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर आरोपींनी मृतदेह जंगलात खड्डा खोदून पुरला. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल आणि अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुलराज यांच्या मार्गदर्शनाखाली कोरचीचे पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे आणि त्यांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने या गुन्ह्याचा तपास पूर्ण केला. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली