गडचिरोली : घराच्या अंगणात शेकोटी पेटवून कुटुंबीयांसमवेत जेवण सुरू असतानाच पैशाच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान रक्तरंजित घटनेत झाले. मद्यधुंद मुलाने रागाच्या भरात शेकोटीतील जळते लाकूड उचलून जन्मदात्या वडिलांच्या डोक्यावर प्रहार केला. या हल्ल्यात वडिलांचा जागीच मृत्यू झाला. काळजाचा थरकाप उडविणारी ही घटना कुरखेडा तालुक्यातील चारभट्टी येथील बिरसा नगरमध्ये बुधवारी (२९ ऑक्टोबर) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. मनोहर निरंगशहा गोटा (५१) असे मृत पित्याचे नाव असून, नागेश मनोहर गोटा (२९) असे आरोपी मुलाचे नाव आहे.

बुधवारी सायंकाळी परिसरात अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे गोटा कुटुंबीयांनी घराच्या अंगणात शेकोटी पेटविली होती. शेकोटीच्या उबेत कुटुंबातील सदस्य जेवणासाठी बसले असतानाच मनोहर आणि नागेश यांच्यात पैशाच्या कारणावरून वाद सुरू झाला. सुरुवातीला शाब्दिक चकमकीचे स्वरूप असलेला हा वाद काही वेळातच विकोपाला गेला. नागेश मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याचा राग अनावर झाला. संतापाच्या भरात त्याने शेकोटीतील जळते लाकूड उचलले आणि थेट वडिलांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. या प्रहारामुळे मनोहर गोटा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रक्तबंबाळ अवस्थेत ते कोसळले. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांकडून आरोपीला अटक

घटनेची माहिती मिळताच पुराडा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कुरखेडा ग्रामीण रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिसांनी आरोपी नागेश गोटा याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पुराडा पोलीस करीत आहेत.
….