गडचिरोली: जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात पाणी काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. यासाठी वनविभाग बचावाचे धडे देण्यासाठी गावात जनजागृतीपर चित्रफीत दाखवत असतानाच, दुसरीकडे त्याच घराच्या मागे दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका तरुणावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना कुरखेडा तालुक्यातील धमदीटोला येथे घडली. २४ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. वनाधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच हा हल्ला झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून, वनविभागाच्या जनजागृती मोहिमेचा पुरता फज्जा उडाला आहे.
धमदीटोला परिसरात मागील आठवडाभरापासून एका बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. गावकऱ्यांमधील भीती दूर करण्यासाठी वनविभागाचे पथक गावात फिरते चित्रपटगृह चालवत होते. ‘बिबट्यापासून स्वतःचा बचाव कसा करावा’ याचे मार्गदर्शन सुरू असतानाच, सदानंद धरमदास उईके (३२) हा तरुण लघुशंकेसाठी घराच्या मागील बाजूस गेला.
तिथेच दबा धरून बसलेल्या बिबट्याने थेट सदानंदच्या अंगावर झडप घेतली. सदानंदने आरडाओरड केल्यावर चित्रफीत पाहणारे नागरिक आणि वनकर्मचारी घटनास्थळाकडे धावले. लोकांचा गराडा पाहताच बिबट्याने तिथून धूम ठोकली, ज्यामुळे सदानंदचा जीव थोडक्यात वाचला. त्याला तातडीने कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
विशेष म्हणजे, गेल्या पाच दिवसांतील ही तिसरी घटना आहे. यापूर्वी मका पिकात लपलेल्या बिबट्याला हाकलून लावताना दोन तरुण जखमी झाले होते, तर एका शेतकऱ्याच्या वासरालाही बिबट्याने फस्त केले आहे. रक्ताची चटक लागलेला हा बिबट्या आता थेट वस्तीत शिरत असल्याने गावकऱ्यांचा संयम सुटत चालला आहे. बुधवारी सकाळी उपजिल्हा रुग्णालयात काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटील हरडे, माजी पं.स. सभापती गिरीधर तितराम आणि माजी पं.स. सदस्य धरमदास उईके यांनी जखमीची भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी त्यांनी वन परिक्षेत्र अधिकारी लक्ष्मीकांत गोपूलवाड यांच्याशी संपर्क साधून तीव्र संताप व्यक्त केला. नरभक्षक बिबट्याला तातडीने पिंजऱ्यात जेरबंद करा आणि जखमींसह पशुपालक शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली. बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांना घराबाहेर निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे जनजागृती करण्यात वेळ घालवण्यापेक्षा तत्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

