गडचिरोली : गडचिरोलीतील महिला व बाल रुग्णालयात माता-बाल मृत्यूचे सत्र सुरूच असून, ८ सप्टेंबर रोजी आणखी एका प्रसूतीदरम्यान माता आणि तिच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला. धानोरा तालुक्यातील मुरुमगाव येथील ३१ वर्षीय दिव्या रामसिंग उसेंडी यांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला. अवघ्या १५ दिवसांत माता-बाल मृत्यूची ही तिसरी घटना असल्याने जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दिव्या रोजगारासाठी तामिळनाडूत गेल्या होत्या. प्रसूतीची तारीख जवळ आल्याने काही दिवसांपूर्वी त्या मुरुमगाव येथे परतल्या. ८ सप्टेंबर रोजी प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना मुरुमगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तातडीने गडचिरोलीतील महिला व बाल रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, प्रसूतीदरम्यान दिव्या आणि त्यांच्या बाळाचा मृत्यू झाला.
एकामागून एक माता आणि नवजात बाळांचे जीव जात असताना आरोग्य विभाग नेमका कोणाची वाट पाहत आहे, मागील तीन ते पाच वर्षांपासून जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेतील प्रश्न कायम असतानाही त्यावर ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच गडचिरोलीचे पालकमंत्री असताना जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचे चित्र आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षानंतरही जबाबदारी निश्चित होत नसेल, तर सामान्य नागरिकांच्या आरोग्याचा वाली कोण, असा सवाल आता उपस्थित होत आहे. या घटनेनंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी महिला व बाल रुग्णालयाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. मात्र, या मृत्यूबाबत प्रशासनाकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
यापूर्वी दोन माता-बाल मृत्यू
२३ ऑगस्ट रोजी चामोर्शी तालुक्यातील जामगिरी येथील २३ वर्षीय जिजा हंसराज सातर आणि त्यांच्या बाळाचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणात वेळेवर उपचार न मिळाल्याचा आरोप असून, कारवाई अद्याप प्रलंबित आहे. त्यानंतर २९ ऑगस्ट रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील कोजबी येथील २८ वर्षीय नाजुका दिवाकर राऊत यांचा गडचिरोलीच्या महिला व बाल रुग्णालयात प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणाचीही चौकशी सुरू आहे.
दोन घटनांनंतरही यंत्रणा सुधारली नाही आणि तिसरा मृत्यू झाला. आणखी किती माता-बालकांचे जीव गेल्यानंतर आरोग्य विभागाला जाग येणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे. सलग मृत्यूंची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी डॉक्टर, अधिकारी आणि संबंधित यंत्रणेची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत आहे.
एका घटनेनंतर दुसरी, दुसरीनंतर तिसरी घटना घडूनही जर जबाबदारी निश्चित होत नसेल, तर आणखी किती मृत्यू झाल्यानंतर प्रशासन जागे होणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. मुख्यमंत्रीच जिल्ह्याचे पालकमंत्री असताना आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींवर अधिकारी निर्भयपणे दुर्लक्ष करीत असतील आणि त्यांच्यावर कारवाई होत नसेल, तर गडचिरोलीतील सामान्य नागरिकांनी दाद मागायची तरी कोणाकडे, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
सलग माता-बाल मृत्यूंची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करून दोषी डॉक्टर, अधिकारी तसेच संबंधित यंत्रणेची जबाबदारी निश्चित करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
