गडचिरोली : जिल्हा महिला व बाल रुग्णालयात प्रसूतीनंतर अतिरक्तस्राव झाल्याने २८ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नाजुका दिवाकर राऊत (२८, रा. कोजबी, ता. नागभीड, जि. चंद्रपूर) यांचा शनिवारी मध्यरात्री मृत्यू झाला. त्यांच्या नवजात बाळाचाही प्रसूतीनंतर काही वेळातच मृत्यू झाला. आठ दिवसांत याच रुग्णालयात झालेला हा दुसरा मातामृत्यू आहे.

नाजुका राऊत यांना प्रसूतीसाठी बोदली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून २८ ऑगस्ट रोजी रात्री १.२३ वाजता गडचिरोली येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. २९ ऑगस्ट रोजी सकाळी सहाच्या सुमारास त्यांची सामान्य प्रसूती झाली. त्यांनी अडीच किलो वजनाच्या बाळाला जन्म दिला. मात्र, जन्मानंतर काही वेळातच बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर सकाळी आठच्या सुमारास नाजुका यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. रक्तस्राव वाढत गेल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनली.

परिस्थिती लक्षात घेऊन ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण किलनाके आणि डॉ. प्रशांत आखाडे यांना पाचारण करण्यात आले. डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल होत महिलेची तपासणी केली. रक्तस्राव नियंत्रणात आणण्यासाठी शस्त्रक्रियेसह आवश्यक उपचार करण्यात आले. त्यानंतर रक्तस्राव थांबला आणि नाजुका यांना रक्त देण्यात आले. दुपारी तीनच्या सुमारास त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले. सायंकाळी सात ते आठ वाजेपर्यंत प्रकृती स्थिर होती. मात्र, मध्यरात्रीनंतर अचानक त्यांना झटके येण्यास सुरुवात झाली. डॉक्टरांकडून उपचार सुरू असतानाच रात्री साडेएकच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

रक्त मिळण्यास विलंब : नातेवाईकांचा आरोप

महिलेची प्रकृती गंभीर असताना रक्त उपलब्ध होण्याच्या प्रक्रियेत विलंब झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. उपचारातील कथित दिरंगाई आणि आरोग्य यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळेच माता आणि बाळाचा जीव गेला, असा दावा त्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून नेमकी कारणे स्पष्ट करावीत, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

आठवडाभरात दुसरी घटना

याच जिल्हा महिला व बाल रुग्णालयात आठ दिवसांपूर्वी चामोर्शी येथील जिजा सातर (२६) या गर्भवती महिलेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला होता. त्या घटनेची चर्चा आणि त्याबाबतचे प्रश्न अद्याप कायम असतानाच नाजुका राऊत यांच्या मृत्यूची घटना समोर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मातामृत्यूचे प्रमाण, प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरची काळजी तसेच आपत्कालीन उपचार व्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेबाबत जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी किलनाके यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.