गडचिरोली : प्रस्तावित पोलाद प्रकल्पासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत (एमआयडीसी) करण्यात येणाऱ्या भूसंपादनाविरोधात जयरामपूर-येनापूर परिसरातील १३ गावांतील शेतकऱ्यांचा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनानंतर आता शेतकऱ्यांनी येनापूर येथे चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. भूसंपादनाचा प्रस्ताव रद्द करून २ हजार ९६ हेक्टर जमीन प्रकल्पातून वगळण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांशी चर्चा करावी, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

येनापूर येथील मंडळ अधिकारी कार्यालयासमोर २९ ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील ४९२ हेक्टर आणि पाचव्या टप्प्यातील १ हजार ६०४ हेक्टर अशा एकूण २ हजार ९६ हेक्टर जमिनीच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता भूसंपादनाची प्रक्रिया पुढे रेटली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. मागण्यांवर शासनाने लेखी निर्णय दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी आंदोलनस्थळी भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला. आंदोलन मागे घेण्यासाठी त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. येत्या पाच नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणून शेतकऱ्यांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडण्याची तयारीही त्यांनी दर्शविली. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी नागपूरला जाण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळून लावला. मुख्यमंत्रीच आंदोलनस्थळी आले पाहिजेत आणि बाधित शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा केली पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे आंदोलनावर तोडगा निघू शकला नाही.

दुसरीकडे, येनापूर येथे चक्काजाम केल्यानंतर आष्टी येथेही चक्काजाम आंदोलन करण्यासाठी शेतकरी निघाले होते. मात्र, त्यांना रोखण्यासाठी प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला. या बंदोबस्तावर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध केला. आंदोलनामुळे परिसरातील वाहतूक काही काळ ठप्प झाली. वाहनांच्या रांगा लागल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

संमतीचा प्रश्न ऐरणीवर

काही गावातील शेतकऱ्यांनी भूसंपादनासाठी संमती दिलेली नसतानाही संमतीपूर्वक करारनामा झाल्याचे गृहीत धरून नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू केल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. संबंधित राजपत्रीय अधिसूचना रद्द करावी, शेतकऱ्यांच्या हरकतींचा विचार करावा आणि भूसंपादनाची पुढील कार्यवाही थांबवावी, अशी त्यांची मागणी आहे. त्यामुळे भविष्यात हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.