गडचिरोली : आठवडाभरापूर्वी नक्षलवाद्यांनी एक पत्रक जारी करून सरकारपुढे युद्धविरामाचा प्रस्ताव ठेवला होता. यावर, आधी शस्त्रे टाका व आत्मसमर्पण करा, अशी भूमिका सरकारने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर हादरलेल्या नक्षलवाद्यांनी आज १० एप्रिलला एक पत्रक जारी करीत युद्धविरामाचा पुनरुच्चार केला आहे. जवानांना उद्देशून ‘अपने ही लोग हैं, गोली मत चलावें,’ अशी विनंती करतानाच, बस्तरमधील मोहिमा थांबवून अनुकूल वातावरण निर्मिती करावी आणि शांतीवार्ता करावी, असे नमूद करीत नक्षलवाद्यांनी युद्धविरामाचा चेंडू सरकारकडे टोलवला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मार्च २०२६ अखेरपर्यंत देशातून नक्षलवाद हद्दपार करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार, गेल्या १५ महिन्यांत जवानांनी ४०० हून अधिक नक्षलवाद्यांना ठार केले. छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा आणि झारखंड या राज्यांत नक्षलविरोधी अभियान अधिक गतिमान झाले आहे. या पार्श्वभूमीवर देशातील दुसऱ्या क्रमांकाचा नक्षल नेता अभय ऊर्फ सोनू ऊर्फ भूपती याने पत्रक जारी करून सरकारपुढे युद्धविरामाचा प्रस्ताव ठेवला होता. दरम्यान, उत्तर पश्चिम सब झोनल ब्युरो रुपेश याचे नवे पत्रक समोर आले आहे. त्यात शांतीवार्तासाठी आम्ही तयार आहोत, पण त्यासाठी अनुकूल वातावरण गरजेचे आहे, अशी भूमिका त्याने मांडली आहे.

सरकारची जबाबदारी

पत्रकात म्हटले आहे की, छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी युद्धविरामाचा प्रस्ताव पुढे नेण्यासाठी अनुकूल वातावरणाची मागणी फेटाळून लावली. मात्र, आत्मसमर्पण हे सगळ्या समस्यांचे उत्तर नाही. सरकारला नक्षलवादविरोधी मोहिमा यापुढेही राबवायच्या आहेत, असे यावरून दिसते. मात्र, कारवाया थांबविल्या, वातावरण अनुकूल झाले तरच शांतीवार्ता करता येईल, ही सरकारची जबाबदारी आहे.

शिक्षण, रेशन, वीज, पाणी, आरोग्य सुविधांना विरोध नाही

छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा आणि विजापूर सीमावर्ती भागातील एकेली आणि बेलणार परिसरात ३१ मार्चला रेणुका उर्फ बानू या महिला नक्षलवाद्याला ठार मारण्यात सुरक्षा दलाला यश आले होते. याचा उल्लेख पत्रकात असून ती प्रतिकूल परिस्थितीतही लढत राहिल्याचे म्हटले आहे. आम्हाला जनताविरोधी ठरवले जात आहे. मात्र, शाळा, अंगणवाडी, दवाखाना, रेशन, पाणी व वीज या मूलभूत बाबींना आम्ही कधी विरोध केलेला नाही. एक-दोन विषयांत घाईघाईने चुका झाल्या, त्यानंतर आम्ही माफी मागितल्याचाही उल्लेख पत्रकात आहे.

पोलीस आमचे शत्रू नाहीत

पोलिसांना आम्ही शत्रू म्हणून पाहत नाहीत. आपल्यात युद्ध भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, जनता व कॅडर आपलेच आहेत. त्यामुळे   गोळ्या चालवू नका, अशी विनवणी नक्षलवाद्यांनी पोलिसांना उद्देशून केली आहे.

पोलिसांचे म्हणणे काय? पत्रक पाहिले आहे. मात्र, नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करणे हाच योग्य मार्ग आहे. त्यांनी हिंसेची वाट सोडावी व आत्मसमर्पण करून लोकशाही मार्गाने आपले उर्वरित जीवन सुखकर करावे, असे गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी म्हटले आहे.