गडचिरोली: होळी आणि धुळवडीच्या उत्साह सर्वत्र ओसंडून वाहत असतानाच, गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा नदीच्या पात्रात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये एका उच्चशिक्षित तरुण अभियंत्याचा आणि एका कष्टकरी मजुराचा समावेश असून, या दोन्ही घटनांमुळे जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

पहिली हृदयद्रावक घटना आरमोरी येथील गायकवाड चौक परिसरात घडली. येथील रहिवासी असलेला २५ वर्षीय तरुण अभियंता शुभम नामदेव रामटेके हा मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास आपल्या मित्रांसह वैनगंगा नदीच्या गांगलवाडी टी-पॉईंटवर गेला होता. रंगोत्सव साजरा केल्यानंतर सर्व मित्र आंघोळीसाठी नदीपात्रात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने शुभम अचानक खोल डोहात ओढला गेला. सोबत असलेल्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. स्थानिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढून तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

शुभमच्या निधनाने एका कष्टाळू कुटुंबाचा आधार कायमचा निखळला आहे. त्याचे वडील कबाड व्यवसाय करून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत कुटुंबाचा गाडा हाकत होते. मुलाला इंजिनिअर बनवण्यासाठी त्यांनी मोठी जिद्द बाळगली होती. अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच शुभमला एका खाजगी कंपनीत नोकरी मिळाली होती. घरची परिस्थिती सुधारण्याचे आणि आई-वडिलांचे कष्ट दूर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या एकुलत्या एक मुलाच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


दुसरी घटना वसा येथील वैनगंगा नदीपात्रात दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास घडली. मुन्ना राजेंद्र भोयर (३२), रा. मोहझरी, हा तरुण आपल्या मित्रांसोबत रंग खेळल्यानंतर आंघोळीसाठी नदीवर गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो अचानक खोल पाण्यात गेला आणि बुडाला. आरडाओरड झाल्यानंतर नागरिक मदतीला धावले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. मुन्ना हा मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या निधनाने एका कष्टकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

घटनेची माहिती मिळताच आरमोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेतले. या दोन्ही प्रकरणांत मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.