गडचिरोली : आपल्या पहिल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची निर्घृण हत्या करणारा आणि जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना कारागृहातून पसार झालेला सराईत गुन्हेगार अखेर ११ वर्षांनंतर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. पुरुषोत्तम रामजी भोयर (४०, रा. गडचिरोली, सध्या रा. उसेगाव, जि. चंद्रपूर) असे या आरोपीचे नाव आहे. नाव बदलून आणि ओळख लपवून दुसरा संसार थाटणाऱ्या या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे, ज्या संशयी स्वभावामुळे त्याने पहिली हत्या केली होती, त्याच स्वभावामुळे झालेल्या घरगुती वादातून त्याचे जुने ‘कारनामे’ चव्हाट्यावर आले.

थरारक पार्श्वभूमी

आरोपी पुरुषोत्तम भोयर याने २००५ मध्ये आपल्या पहिल्या पत्नीची चारित्र्याच्या संशयावरून निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणात २००७ मध्ये न्यायालयाने त्याला कलम ३०२ आणि २०१ अन्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. नागपूर मध्यवर्ती कारागृहात आपली शिक्षा भोगत असताना, १५ जून २०१५ रोजी नागपूर खुल्या कारागृहाबाहेर काम करत असताना त्याने पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून पलायन केले होते. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते, मात्र तो वारंवार आपली ओळख बदलून पोलिसांना हुलकावणी देत होता.

नव्या ओळखीचा ‘बुरखा’

कारागृहातून पळ काढल्यानंतर पुरुषोत्तमने चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील उसेगाव येथे आश्रय घेतला. तिथे त्याने आपली खरी ओळख पूर्णपणे लपवली आणि नाव बदलून तो मिस्त्रीकाम करू लागला. इतकेच नाही, तर कोणालाही संशय येऊ नये यासाठी त्याने तिथे दुसरे लग्न करून नवा संसारही थाटला होता. गेल्या ११ वर्षांपासून तो एक सामान्य नागरिक म्हणून तिथे राहत होता.

गुन्हगारी वृत्तीमुळे पुन्हा अडकला

पुरुषोत्तमचा मूळचा संशयी स्वभाव बदललेला नव्हता. त्याने आपल्या दुसऱ्या पत्नीलाही त्रास देण्यास सुरुवात केली. त्याच्या जाचाला कंटाळून पत्नी आपल्या माहेरी गडचिरोली येथे निघून आली. मात्र, तिथेही जाऊन त्याने तिला धमकावल्याने पत्नीने गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या अदखलपात्र गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांना पुरुषोत्तमच्या वागण्याबद्दल संशय आला.

पोलिसांनी जेव्हा त्याच्या कागदपत्रांची आणि जुन्या नोंदींची कसून पडताळणी केली, तेव्हा समोर आलेल्या माहितीने अधिकारीही अवाक झाले. तपासात स्पष्ट झाले की, तक्रार करणारीचा पती हा दुसरा तिसरा कोणी नसून ११ वर्षांपासून फरार असलेला जन्मठेपेचा कैदी आहे. पोलिसांनी तातडीने सापळा रचून पुरुषोत्तमला ताब्यात घेतले. त्याची ओळख पटल्यानंतर त्याला पुन्हा नागपूर मध्यवर्ती कारागृहात उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी रवाना करण्यात आले आहे. या कारवाईमुळे कायद्याचे हात लांब असतात, याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे