गडचिरोली : जिल्ह्यातील नक्षलवाद जवळपास संपुष्टात आला असतानाच, गडचिरोली पोलीस दलाने नक्षलवादविरोधी अभियानांतर्गत आणखी एक मोठे यश संपादन केले आहे. गेल्या ११ वर्षांपासून खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका कट्टर नक्षल समर्थक आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. बापू व्यंकटी जनगम (रा. नडीकुडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
१७ जून रोजी असरल्ली पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बापू जनगम हा नक्षलवाद्यांना रसद आणि गुप्त माहिती पुरवणाऱ्या ‘जनमिलिशिया’ संघटनेशी संबंधित आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न आणि शासकीय सेवकांवर हल्ला करणे यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो दीर्घकाळापासून पोलिसांना चकवा देत फरार होता.
अशी झाली अटक
आरोपी बापू जनगम हा आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी नडीकुडा गावात आल्याची गोपनीय माहिती असरल्ली पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ चक्र फिरवून नडीकुडा गावाला वेढा घातला. गावात शोधमोहीम सुरू असतानाच, शेतशिवार परिसरात दबा धरून बसलेल्या बापूला पोलिसांनी अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले.
गंभीर गुन्ह्यांची नोंद
अटक करण्यात आलेला आरोपी असरल्ली पोलीस ठाण्यातील अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये मुख्य आरोपी आहे. त्याच्यावर २००७ ते २०१५ दरम्यान भादंवि कलम ३०२ (खून), ३०७ (खुनाचा प्रयत्न), ३५३ (सरकारी कामात अडथळा) आणि ३३२ (शासकीय कर्मचाऱ्याला दुखापत करणे) अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे, २०१५ मधील एका खुनाच्या गुन्ह्यात तो गेल्या ११ वर्षांपासून फरार होता. या गुन्ह्यातील इतर सह-आरोपींना गडचिरोली सत्र न्यायालयाने यापूर्वीच जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. स्थानिक गुप्तहेरांच्यामार्फत पोलीस गेल्या काही दिवसांपासून त्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होते. अटक केल्यानंतर आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) हर्षवर्धन बी. जे. आणि पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली असरल्लीचे प्रभारी अधिकारी सपोनि. योगिराज जाधव, पोउपनि. प्रसाद पवार व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
