गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या ‘टीसीओसी’च्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांना दोन नक्षल्यांना अटक करण्यात यश आले आहे. मंगेश ऊर्फ कांडेराम पोटावी (३३ रा. होरादी, छत्तीसगड), चिन्ना मासे झोरे (४०, रा. रामनटोला) असे अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांची नावे आहेत. फेब्रुवारी ते मे या काळात नक्षलवादी ‘टीसीओसी’ (टक्टिकल काऊंटर ऑफेन्सिव्ह कॅम्पेन) साजरा करतात. यादरम्यान ते मोठ्या प्रमाणात हिंसक कारवाया घडवून आणतात. या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेत दोन नक्षल्यांना अटक करण्यात यश आले. त्यापैकी मंगेश हा जहाल नक्षली असून त्याला गोपनीय माहितीच्या आधारे एटापल्ली तालुक्यातील कसनसूर येथून ताब्यात घेण्यात आले. तो छत्तीसगड राज्यातील नारायणपूर येथे परालकोट दलम कमांडर (चेतना नाट्य कलामंच) पदावर कार्यरत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नागपूर: भोंदू धीरेंद्र शास्त्री माफी मागा – नाना पटोले

२००५ मध्ये नक्षल चळवळीत सहभागी झाल्यानंतर त्याने गारपा व बोरेवाडा चकमकीत सक्रिय भूमिका निभावली होती. त्याच्यावर दरोडा, खून, जाळपोळ आदी प्रकरणात गुन्हे दाखल आहेत, तर दुसरा नक्षली चिन्ना हा जनमिलिशिया सदस्य म्हणून सक्रिय होता. त्याला जांबिया जंगल परिसरातून ताब्यात घेण्यात आले. गर्देवाडा भूसुरुंगस्फोट व चकमक, बांधकामावरील वाहनांची जाळपोळ करणे आदी प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे. गडचिरोली पोलिसांनी राबवलेल्या नक्षलविरोधी अभियानात वर्षभरात ६३ नक्षल्यांना अटक करण्यात यश आले आहे. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी ही कारवाई केली असून नक्षलविरोधी अभियान प्रभावीपणे राबवण्यात येत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gadchiroli police arrested two naxalites ssp 89 zws
First published on: 30-01-2023 at 22:02 IST