गडचिरोली : जिल्ह्यात दारुबंदी असतानाही अवैध दारूविक्रीचा धंदा बिनधास्तपणे सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने होत असताना आता पोलीस यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा एक कथित व्हिडिओ समोर आला आहे. दारूविक्रीच्या ठिकाणी पोलिस अंमलदार नोटांचे बंडल स्वीकारताना आणि संबंधित विक्रेत्यांशी चर्चा करताना दिसत असल्याने या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी होत आहे. ४ सप्टेंबर रोजी हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला.
गडचिरोली तालुक्यातील अमिर्झा टोली येथील हा व्हिडिओ ऑक्टोबर २०२५ मधील असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली. चित्रफितीत चार-पाच जणांच्या उपस्थितीत एक पोलिस अंमलदार बसलेला दिसतो. त्याच्या हातात नोटांचे बंडल असून संबंधित व्यक्तींशी त्याचे संभाषण सुरू आहे. या संभाषणात काही दारूविक्रेत्यांना कारवाईपासून वाचविण्याचा संदर्भ असल्याचे दिसून येते. ‘पाच लोकांना ॲडजस्ट करतो’, तसेच अडचण निर्माण झाल्यास थेट संपर्क साधण्याचा सल्ला दिल्याचेही चित्रफितीत ऐकू येते.
या प्रकारामुळे दारुबंदीची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेतील काही घटक आणि अवैध दारूविक्रेत्यांमध्ये संगनमत आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे, संबंधित ठिकाणी दारूविक्री करणारा एक व्यक्ती ‘आता दणादण दारू विकायची, भ्यायचं कोणालाच नाही’, असे म्हणताना चित्रित झाला आहे. त्यामुळे या संवादाचीही चौकशी होणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, चित्रफितीत पाच अधिकारी-अंमलदारांची नावे घेतली जात असल्याचे समोर आले आहे. यापैकी दोघांची आंतरजिल्हा बदली झाली असून एक जण सेवानिवृत्त झाला आहे. उर्वरित एक अंमलदार सध्या गडचिरोली पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी या प्रकरणाचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केल्याचे सांगितले.
चौकशीनंतर कारवाईचे संकेत
‘व्हिडिओची पडताळणी केली जाईल. अशा प्रकारचे गैरवर्तन कदापि खपवून घेतले जाणार नाही. संबंधित अंमलदारावर योग्य ती कडक कारवाई केली जाईल.’ – एम. रमेश, पोलीस अधीक्षक, गडचिरोली
