गडचिरोली : शहरातील वाढत्या वाहतुकीमुळे अपघातांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली २९ जून ते ३ जुलैदरम्यान मोहीम राबविली. पाच ठिकाणी केलेल्या कारवायांत २४ अल्पवयीन मुले वाहने चालविताना आढळली. ही वाहने पकडून त्यांच्या पालकांवर गुन्हा नोंदविण्यात आला.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. तपासणी मोहिमेत अल्पवयीन मुले वाहन चालविताना मिळून आली. या सर्वांकडे कुठल्याही प्रकारचा वाहन परवाना नसतानादेखील त्यांच्या पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना दुचाकी वाहन वापरण्यासाठी दिल्याने मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम २०१९ कलम १९९ (ए) अन्वये सदर २४ पालकांवर गुन्हे दाखल केले असून वाहने जप्त करण्यात आली आहेत. मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम २०१९ कलम १९९ (ए) अन्वये अल्पवयीन व्यक्तीने वाहतूक कायद्याचे उल्लंघन केल्यास त्याच्या पालकांना जबाबदार धरण्यात येते.
यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक सत्य साई कार्तिक, गोकुळ राज जी., उपअधीक्षक सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. विनोद चव्हाण, सहायक निरीक्षक शरद मेश्राम व अंमलदार यांनी ही कारवाई केली.
२५ हजार रुपये दंडाची तरतूद
तीन वर्षांपर्यंत कारावास व २५ हजार रुपये दंडाची तरतूद आहे. मोटार वाहन कायद्यानुसार अल्पवयीन मुले वाहन चालविताना आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.