गडचिरोली : वन्यजीव तस्करीविरोधातील मोठ्या कारवाईत छत्तीसगड वनविभाग आणि पोलिसांनी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर दोन वाघांच्या कातडीसह अहेरी येथील पोलीस शिपाई आणि होमगार्डला अटक केली आहे. या दोघांचा आंतरराज्यीय वन्यजीव तस्करीशी संबंध उघड झाल्याने सुरक्षा यंत्रणेतच खळबळ उडाली असून, या रॅकेटमागील मोठ्या साखळीचा तपास सुरू करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये अहेरीच्या प्राणहिता पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस शिपाई बिजेश्वर गेडाम आणि होमगार्ड बाबूराव मडावी यांचा समावेश आहे. छत्तीसगडच्या पश्चिम भानुप्रतापपूर वनमंडळाचे वनमंडळ अधिकारी एस. नवीनकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी होणार असल्याची खात्रीशीर माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी मध्यरात्री महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील बांदे वनपरिक्षेत्रात वनविभाग आणि पोलिसांनी संयुक्त सापळा रचला.

दरम्यान, सीमेवरून जाणारी एक संशयित दुचाकी अडवून तिची झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान गोणीत लपवून ठेवलेली दोन वाघांची कातडी आढळून आली. वनविभागाने तत्काळ दोन्ही आरोपींना ताब्यात घेत दुचाकीसह वाघांची कातडी जप्त केली. प्राथमिक चौकशीत आरोपींपैकी एक पोलीस शिपाई तर दुसरा होमगार्ड असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे.

मोठ्या तस्करीच्या जाळ्याचा तपास

दोन्ही आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना वनकोठडी सुनावली आहे. जप्त करण्यात आलेल्या वाघांच्या कातड्या कोणत्या भागातील आहेत, या वाघांची शिकार नेमकी कुठे करण्यात आली, या प्रकरणामागे आंतरराज्यीय वन्यजीव तस्करांचे संघटित रॅकेट कार्यरत आहे का, तसेच ही कातडी कोणाला विक्रीसाठी नेली जात होती, या सर्व बाबींचा छत्तीसगड वनविभाग सखोल तपास करत आहे.