सुमित पाकलवार, लोकसत्ता गडचिरोली : जिल्हाभरात मागील तीन दशकांपासून दारूबंदी असली तरी येथील नागरिकांसाठी छुप्या मार्गाने होणारी अवैध दारू तस्करी नवी नाही. त्यामुळे आजही प्रत्येक गावात गल्लोगल्ली दारू मिळते. अनेकदा पोलिसांच्या आशीर्वादाने हे दारू तस्कर फोफावले असल्याचे आरोपही होत असतात. मात्र, मागील दहा महिन्यात पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी विशेष लक्ष घालून केलेल्या कारवाईत जिल्हाभरात केवळ दारूच नव्हे तर गांजा, सुगंधित तंबाखू आणि गाय तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. मागील दहा महिन्यात गडचिरोली पोलिसांनी तब्बल ११ कोटींच्या अवैध मुद्देमालासह २०९५ तस्करांना ताब्यात घेतल्याने तस्करांचे मनसुबे उधळून लावण्यात त्यांना यश आले आहे. आणखी वाचा-नागपूर: गंगाजमुनात १५ वर्षीय मुलीकडून देहव्यापार नक्षलग्रस्त मागास परंतु निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेल्या गडचिरोली जिल्ह्याला दारूबंदीनंतर अवैध व बनावट दारू तस्करीचे ग्रहण लागले. ते आजतागायत कायम आहे. त्यामुळे कायम कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. सोबतच सरकार दरबारी नोंद नसली तरी बनावट दारू पिल्यामुळे मृत्यू झाल्याचे अनेक प्रकरणे आहेत. जिल्ह्याच्या चारही सीमाभागातून होणारी सर्रास दारू तस्करी यामागचे मूळ कारण आहे. मागील काही वर्षांपासून तस्करांनी जिल्ह्याला सुगंधित तंबाखू, गांजा आणि गाय तस्करीचा अड्डा देखील बनविल्याचे चित्र आहे. यातून महिन्याकाठी शेकडो कोटींची उलाढाल होत असल्याने यंत्रणेत देखील या तस्करांचे बरेच 'लाभार्थी' आहेत. त्यामुळे राजरोसपणे तस्करी सुरूच असते. परंतु दहा महिन्यांपूर्वी रुजू झालेले पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी नक्षलवाद्यांसह अवैध तस्करीवर विशेष लक्ष दिल्याने तस्करांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे जिल्हाभरात दररोज धडक कारवाई सुरू आहे. दहा महिन्यात पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ५.५० कोटींची दारू, ३.५० कोटींच्या गायी आणि मुद्देमाल, ८० लाख किमतीचा ४.१६ क्विंटल गांजा, ४० लाखांचा सुगंधित तंबाखू मुद्देमालासह जप्त केला आहे. तर तब्बल २०९५ आरोपी तस्करांना ताब्यात घेतले आहे. यात सर्वाधिक दारू तस्करांचा समावेश आहे. मधल्या काळात वाढलेली गांजा आणि गाय तस्करी पोलिसांसाठी नव्हे आव्हान आहे. आणखी वाचा-लॉजवर नेऊन गुंगीचे औषध देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार मुख्य तस्कर मोकाट पोलिसांनी दारू तस्करीविरुद्ध धडक कारवाईचा सपाटा लावला असला तरी मुख्य दारू तस्कर अद्याप मोकाट आहेत. जिल्ह्याचा दक्षिण आणि उत्तर भागात मोठ्या प्रमाणात दारूचा अवैध पुरवठा करणाऱ्यांमध्ये काही राजकीय नेत्यांची नावे नेहमीच घेतल्या जातात. त्यांची माणसे यात सक्रिय असल्याने ते यंत्रणेला जुमानत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे यांचा बंदोबस्त केल्यास दारू तस्करीवर कायमचा आळा बसू शकतो. गडचिरोली जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर या तस्करांविरोधात आम्ही मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या आहेत. पुढेही कारवाई सुरूच राहणार असून यातील मोठे मासे लवकरच गजाआड दिसतील. सोबतच सीमाभागातील ज्या-ज्या बारमधून दारू तस्करी होत असेल त्यांचे परवाने रद्द करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात येईल. -नीलोत्पल, पोलीस अधीक्षक, गडचिरोली