गडचिरोली : नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांवर घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने जंगलात जमिनीत पुरून ठेवलेला शस्त्रसाठा आणि स्फोटक साहित्य गडचिरोली पोलीस व केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) संयुक्त कारवाईत जप्त केला. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील कुमनार जंगल परिसरात झालेल्या या कारवाईत एकूण १४ अग्निशस्त्रे, आयईडीसह स्फोटक साहित्य आणि अन्य साहित्य हस्तगत करण्यात आले. विशेष म्हणजे, नव्याने स्थापन करण्यात आलेल्या बंगाडी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील ही महत्त्वपूर्ण कारवाई मानली जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोधी मोहिमेला सातत्याने यश मिळत असून, नक्षलवादी संघटना कमकुवत झाल्यानंतरही जंगलात लपवून ठेवलेल्या शस्त्रसाठ्याचा शोध घेण्याची मोहीम सुरू आहे. यापूर्वी २३ मे, २७ मे आणि २७ जून रोजी अशाच स्वरूपाच्या कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यानंतर १ ऑगस्ट रोजीही पोलीस आणि सीआरपीएफने आणखी एक यशस्वी कारवाई करत मोठा शस्त्रसाठा जप्त केला.
गोपनीय माहितीच्या आधारे महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगतच्या कुमनार जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि स्फोटके पुरून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ३१ जुलै रोजी पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली प्राणहिता विशेष अभियान पथकाच्या चार तुकड्या, बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) आणि सीआरपीएफचे जवान शोधमोहिमेसाठी रवाना झाले.
मोठा शस्त्रसाठा जप्त
१ ऑगस्ट रोजी जंगल परिसराची कसून तपासणी करण्यात आली. या वेळी जमिनीत लपवून ठेवलेली एक एसएलआर रायफल, एक .३०३ रायफल, सात १२-बोअर रायफल, तीन सिंगल शॉट रायफल, दोन बीजीएल लाँचर्स, तीन एसएलआर मॅगझिन, एक आयईडी आणि दोन बॅटऱ्या असा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. सर्व साहित्य पंचनामा करून ताब्यात घेण्यात आले.
पोलीस अधीक्षकांनी केले कौतुक
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक, अहेरी (प्राणहिता) हर्षवर्धन बी. जे., पोलीस उपअधीक्षक (अभियान) सुनील उईके यांच्या देखरेखीखाली विशेष अभियान पथक, गुप्तवार्ता शाखा, बीडीडीएस आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्तपणे पार पाडली. या कारवाईतील जवानांचे पोलीस अधीक्षकांनी कौतुक केले आहे.
