गडचिरोली : भामरागड उपविभागातील छत्तीसगड सीमेलगतच्या जंगल पारिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका पुरुष नक्षलवाद्याला कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे. या कारवाईत नक्षलवाद्यांचे दोन तळ उद्ध्वस्त करण्यात आले असून घटनास्थळावरून एक एके-४७ आणि एक एसएलआर रायफल जप्त करण्यात आली आहे.

दरम्यान, नक्षल्यांच्या गोळीबारात सी-६० पथकाचा एक जवान जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी तातडीने हलवण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ फेब्रुवारीच्या संध्याकाळी नक्षलवाद्यांच्या ‘कंपनी क्रमांक १०’ चे सदस्य आणि छत्तीसगडमधील एका दलमची फोदेवाडा जंगल परिसरात हालचाल असल्याची विश्वसनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे भामरागडच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात सी-६० च्या १४ पथकांनी रात्रीच शोधमोहीम हाती घेतली.

काल दिवसा झालेल्या चकमकीदरम्यान पोलिसांनी नक्षलवाद्यांचे दोन तळ उद्ध्वस्त केले. मात्र, घनदाट जंगल आणि प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेत नक्षलवादी पसार झाले होते. घटनास्थळावरून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त केले आहे.

मोहीम अधिक तीव्र करण्यासाठी गुरुवारी सकाळी अतिरिक्त ४ सी-६० पथके आणि सीआरपीएफच्या क्यूएटी तुकडीला पाचारण करण्यात आले. सकाळपासूनच या भागात अधूनमधून गोळीबार सुरू होता. शोधमोहिमेदरम्यान दुपारी एका पुरुष नक्षलवाद्याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. त्याच्या जवळील अत्याधुनिक शस्त्रे जप्त करण्यात आली असून, या चकमकीत अन्य काही नक्षलवादी जखमी किंवा ठार झाल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. अद्याप मृत नक्षलवाद्याची ओळख पटलेली नाही.

दरम्यान, संध्याकाळच्या सुमारास नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सी-६० चा एक जवान गोळी लागून जखमी झाला. जखमी जवानाला सुरक्षित बाहेर काढून पुढील उपचारासाठी हलवण्याची प्रक्रिया पोलीस दलाकडून सुरू आहे. सदर जंगल परिसरात अद्यापही शोधमोहीम सुरू असून, ही मोहीम पूर्ण झाल्यानंतरच चकमकीचा सविस्तर तपशील समोर येईल, असे गडचिरोली पोलीस दलाने स्पष्ट केले आहे.