गडचिरोली : जिल्ह्यात मागील काही वर्षापासून सुरू असलेल्या गांजा तस्करीवर गडचिरोली पोलिसांनी आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई करत तब्बल सव्वा कोटी रुपयांचा गांजा जप्त केला आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने कुरखेडा उपविभागातील मालेवाडा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील हुऱ्यालदंड येथे ही धडक कारवाई केली. यावेळी प्रमुख आरोपी कृष्णा हरसिंग बोगा (वय ४१, रा. हुऱ्यालदंड, ता. कुरखेडा) याला अटक करण्यात आली आहे.
कुरखेडा तालुक्यातील हुऱ्यालदंड येथे राहणारा कृष्णा बोगा हा त्याच्या घराजवळील सांदवाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर गांजाची लागवड करत असून, तो हा माल लवकरच विक्री करण्याच्या तयारीत आहे. अशी गोपनीय माहिती पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली होती. यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक तातडीने हुऱ्यालदंड गावाकडे रवाना करण्यात आले. गावात पोहोचल्यानंतर, पोलीस पथकाने सर्व कायदेशीर प्रक्रियांचे पालन करत आणि स्थानिक पंचांना सोबत घेऊन आरोपी कृष्णा बोगा याच्या घराची झडती घेण्यास सुरुवात केली असता त्यांना घरामागे असलेल्या सांदवाडीतील दृश्य बघून पोलिसही चक्रावले.
आरोपीने या जागेत गांजाच्या झाडांची लागवड केली होती. या ठिकाणी गर्द हिरव्या रंगाची पाने, फुले, बोंडे आणि बिया यांनी भरलेली कॅनबिसची (गांजा) झाडे मोठ्या प्रमाणात वाढलेली आढळून आली. ही झाडे विक्रीसाठी तयार झाली होती. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी मागील काही काळापासून जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांविरोधात, विशेषतः अंमली पदार्थ तस्करीविरोधात, कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी सर्व पोलीस ठाणे, उपपोस्टे आणि मदत केंद्रांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना यासंदर्भात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबवण्याचे सक्त निर्देश दिले होते. याच निर्देशांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यात सक्रिय झाले आहे.
सव्वा कोटींचा मुद्देमाल जप्त
पोलीस पथकाने पंचासमक्ष या सर्व गांजाच्या झाडांची मोजणी आणि वजन केले. लागवड केलेला हा संपूर्ण अंमली पदार्थ (निव्वळ गांजा) तब्बल २३९.६६ किलोग्रॅम इतका भरला. पोलिसांनी या जप्त केलेल्या मुद्देमालाचे अधिकृत शासकीय मूल्यांकन केले असता, त्याची किंमत १ कोटी १९ लाख इतकी होती. याप्रकरणी, आरोपी कृष्णा हरसिंग बोगा याच्या विरोधात पुराडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याच्यावर गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जबाबदारी मालेवाडा पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक आकाश नायकवाडी करीत आहेत.
