गडचिरोली : हातात खताची पोती घेऊन शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याला अवघ्या काही फुटांवर दबा धरून बसलेला वाघ दिसलाही नाही. अचानक वाघाने झडप घातली आणि काही क्षणांतच शेतात थरार उडाला. प्रसंगावधान राखत शेतकऱ्याने आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक धावून आले आणि वाघाने तेथून पळ काढला. या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला असून, रविवारी (१३ सप्टेंबर) दुपारी पोर्ला परिसरात ही घटना घडली.
भाऊराव भगवान म्हशाखेत्री (४२) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. पोर्ला-पोटेश्वर मार्गालगत असलेल्या जाबुंरगाटा आणि निबांचासर परिसरातील शेतशिवारात ही घटना घडल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये कमालीची दहशत निर्माण झाली आहे. रविवारी दुपारी सुमारे १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान भाऊराव म्हशाखेत्री शेतात खत टाकण्याचे काम करीत होते. शेतात काम सुरू असतानाच जवळच दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. वाघाच्या झडपेमुळे ते जखमी झाले. मात्र, त्यांनी घाबरून न जाता आरडाओरड करण्यास सुरुवात केली. आवाज ऐकून जवळील नागरिक घटनास्थळी धावून आले. माणसांची चाहूल लागताच वाघाने तेथून धूम ठोकली.
शेतात जाण्यापूर्वीच धाकधूक
या घटनेनंतर पोर्ला परिसरातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाळ्यात शेतीची विविध कामे सुरू असताना शेतकऱ्यांना वारंवार शेतात जावे लागते. निंदणी, खत टाकणे, बांध-बंदिस्तीची कामे, पाळे साफ करणे यासह ई-पीक पाहणीसाठीही शेतात जाणे आवश्यक असते. मात्र, शेतशिवारात वाघाचा वावर असल्याने आता प्रत्येक वेळी शेतात पाऊल ठेवताना जीव मुठीत घेऊन जावे लागत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत. विशेषतः झुडपे, उंच गवत आणि पिकांच्या आड वाघ दबा धरून बसण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे वनविभागाने केवळ वाघाचा शोध घेण्यापुरती कारवाई न करता परिसरात त्याचा वावर नेमका कुठे आहे, याची पाहणी करून ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
वाघाचा तातडीने बंदोबस्त करा
वाघाच्या हल्ल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी वनविभागाने तातडीने पावले उचलण्याची मागणी करण्यात आली आहे. वाघाचा वावर असलेल्या भागात नियमित गस्त वाढवावी, आवश्यक ठिकाणी कॅमेरे लावावेत आणि वाघाच्या हालचालींचा मागोवा घ्यावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जखमी भाऊराव म्हशाखेत्री यांना योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत तसेच नियमानुसार शासनाची आर्थिक मदत मिळावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन वनविभाग आणि महसूल प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.
