गडचिरोली : गावालगतचा नाला दुथडी भरून वाहत असल्याने रुग्णवाहिका पोहोचू शकली नाही आणि प्रसववेदना सुरू झालेल्या गर्भवतीला पुराच्या पाण्यातून स्ट्रेचरवरून दवाखान्यापर्यंत नेण्याची वेळ आली. या जीवघेण्या प्रवासानंतर छाया सुरेश नैताम (२६) यांनी हेडरी येथील खासगी रुग्णालयात जुळ्या मुलींना जन्म दिला. मात्र, अवघ्या २४ व्या आठवड्यात झालेल्या मुदतपूर्व प्रसूतीमुळे दोन्ही बाळांचे वजन अत्यंत कमी होते. त्यापैकी ७०० ग्रॅम वजनाच्या एका चिमुकलीचा मृत्यू झाला, तर केवळ ६०० ग्रॅम वजनाची दुसरी नवजात श्वसनाच्या त्रासामुळे ऑक्सिजनवर असून, तिची प्रकृती गंभीर आहे.
२८ ऑगस्ट रोजी सकाळी नऊच्या सुमारास छाया नैताम यांना प्रसववेदना सुरू झाल्या. मात्र, अतिदुर्गम कोईंदूळ गावालगतचा नाला पुराच्या पाण्याने भरल्याने रुग्णवाहिकेला गावात पोहोचणे शक्य नव्हते. त्यामुळे नैताम यांना स्ट्रेचरवरून पुराचे पाणी ओलांडत पुढे न्यावे लागले. रक्षाबंधनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेने दुर्गम भागातील आरोग्य सुविधा आणि दळणवळणाच्या प्रश्नाकडे पुन्हा लक्ष वेधले होते.
प्राथमिक उपचारांसाठी त्यांना तोडसा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी हेडरी येथील लॉयडस् कालीअम्माल रुग्णालयात हलविण्यात आले. दुपारी चारच्या सुमारास त्यांची प्रसूती झाली. जुळ्या मुली जन्माला आल्या; मात्र, त्यापैकी एक बाळ जन्मतःच मृत असल्याचे आढळले.
२४व्या आठवड्यातच प्रसूती
सामान्य गर्भधारणेचा कालावधी सुमारे ४० आठवड्यांचा असतो. मात्र, छाया नैताम यांची २४व्या आठवड्यातच प्रसूती झाली. त्यामुळे दोन्ही नवजातांचे वजन अत्यंत कमी होते. एका बाळाचे वजन ७०० ग्रॅम, तर दुसऱ्या बाळाचे वजन अवघे ६०० ग्रॅम होते. ७०० ग्रॅम वजनाच्या बाळाचा मृत्यू झाला असून, ६०० ग्रॅम वजनाच्या दुसऱ्या चिमुकलीला श्वसनाचा त्रास होत आहे. तिच्यावर ऑक्सिजनसह तज्ज्ञांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत. दरम्यान, छाया नैताम या कुटुंबासह रोजगारासाठी हैदराबाद येथे गेल्या होत्या. १७ ऑगस्ट रोजी त्या गावी परतल्या होत्या. अवघ्या काही दिवसांतच त्यांना प्रसववेदना सुरू झाल्या आणि पुराच्या पाण्यातून स्ट्रेचरवरून दवाखान्यापर्यंत नेण्याची वेळ आली.
गर्भवतीने जुळ्या मुलींना जन्म दिला. दुर्दैवाने एका बाळाचा गर्भातच मृत्यू झाला होता. अन्य एका बाळासह मातेवर तज्ज्ञांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत. सध्या मातेची प्रकृती स्थिर आहे. — डॉ. भूषण चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी, एटापल्ली
