गडचिरोली : रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीच्या रक्षणाची शपथ घेतली जात असताना, एटापल्ली तालुक्यातील दुर्गम कोईंदूळ गावात मात्र एका गर्भवती महिलेलाच जीव मुठीत घेऊन भर पुरातून प्रवास करावा लागला.
नदीवर पूल नसल्याने रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचू शकली नाही. अखेर गावकऱ्यांनी छाया सुरेश नैताम (२६) यांना स्ट्रेचरवरून नेत पुराच्या पाण्यातून नदी पार केली. त्यामुळे ‘लाडक्या बहिणी’च्या सन्मानाच्या घोषणा आणि दुर्गम भागातील महिलांच्या वास्तवातील फरक पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
शुक्रवारी (२८ ऑगस्ट) सकाळी सुमारे नऊ वाजता छाया नैताम यांना प्रसूती कळा सुरू झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता होती. मात्र गावाला जोडणारा पक्का रस्ता आणि नदीवर पूल नसल्याने पुराचे पाणी आडवे आले. रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचू शकली नाही. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामस्थांनी छाया यांना स्ट्रेचरवरून पुराच्या पाण्यातून नदीपलीकडे नेले. त्यानंतर त्यांना कसनसूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी एटापल्लीमार्गे हेडरी येथील रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
महिनाभरात दुसरी घटना
कोईंदूळमध्ये अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. २० जुलै रोजी पुष्पां सुनील परसा या गर्भवती महिलेलाही रस्त्याअभावी तब्बल दीड किलोमीटर स्ट्रेचरवरून रुग्णवाहिकेपर्यंत न्यावे लागले होते. त्या घटनेनंतरही रस्ता आणि पुलाचा प्रश्न कायम आहे. आता अवघ्या काही आठवड्यांत पुन्हा त्याच गावातील गर्भवती महिलेला पुरातून स्ट्रेचरवरून नेण्याची वेळ आली आहे. एकाच समस्येमुळे वारंवार नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असताना प्रशासनाने मागील घटनेतून नेमका कोणता धडा घेतला, असा सवाल ग्रामस्थांकडून केला जात आहे.
पावसाळा आला की गावांचा संपर्क तुटतो
कोईंदूळसह परिसरातील चार गावांना दरवर्षी पावसाळ्यात याच समस्येला सामोरे जावे लागते. नदी-नाल्यांना पूर आल्यावर रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचत नाही. आजारी व्यक्ती, गर्भवती महिला किंवा अन्य आपत्कालीन रुग्णांना पुराच्या पाण्यातूनच बाहेर आणण्याची वेळ येते. एखादी घटना दुर्दैवी असू शकते; मात्र त्याच कारणामुळे वारंवार अशाच घटना घडत असतील, तर हा केवळ दुर्दैवाचा भाग राहत नाही. तो प्रशासनाच्या नियोजनातील आणि मूलभूत सुविधांच्या उपलब्धतेतील गंभीर अपयश ठरतो. स्वातंत्र्याला ७९ वर्षे उलटूनही रस्ता आणि पूल यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना जीव धोक्यात घालावा लागत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.
हजारो कोटींचा महसूल, तरी रस्ता-पुलासाठी प्रतीक्षा
लोहखनिजाच्या समृद्धीमुळे एटापल्ली तालुक्यातून शासनाला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो. मात्र याच तालुक्यातील अनेक दुर्गम गावांमध्ये आजही रस्ता, पूल, आरोग्य आणि दळणवळणाच्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. एका बाजूला खनिजसंपत्तीमधून कोट्यवधींचा महसूल मिळत असताना दुसऱ्या बाजूला गर्भवती महिलेला पुराच्या पाण्यातून स्ट्रेचरवरून न्यावे लागणे, ही विकासाच्या प्राधान्यक्रमांवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे. या महसुलातील किती निधी दुर्गम आदिवासी गावांच्या मूलभूत सुविधांसाठी खर्च होतो, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
निवडणुकीत आश्वासने; संकटात मात्र कुणीच नाही?
गावागावांत जाऊन विकासाची आश्वासने देणारे लोकप्रतिनिधी नागरिकांच्या या मूलभूत प्रश्नांकडे कधी लक्ष देणार, असा संतप्त सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. निवडणुकीच्या काळात रस्ते, पूल आणि विकासकामांची आश्वासने दिली जातात; मात्र प्रत्यक्षात पावसाळा सुरू झाला की नागरिकांना त्याच समस्यांशी झुंजावे लागते. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीच्या रक्षणाच्या प्रतिकात्मक शपथा घेतल्या जात असताना, कोईंदूळमधील ‘लाडक्या बहिणी’ला मात्र प्रसूतीच्या वेदनांत भर पुरातून स्ट्रेचरवरून जावे लागले. ही केवळ एका महिलेची फरफट नसून दुर्गम भागातील महिलांच्या सुरक्षिततेबाबतच्या सरकारी दाव्यांना आरसा दाखवणारी घटना आहे.
