गडचिरोली : मोबाइल चोरीच्या संशयातून बारा विद्यार्थ्यांना एका शिपायाने छडीने अमानुष मारहाण केल्याची घटना अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथील शासकीय अनुसूचित जाती मुलांच्या निवासी शाळेत उघडकीस आली आहे. या प्रकरणी अहेरी पोलिसांनी आरोपी शिपायाविरुध्द गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, अजय रमेश चंद्रगिरीवार (वय २७, रा. खमनचेरू ता. अहेरी) असे सेवकाचे नाव आहे. तो वांगेपल्ली येथील शासकीय निवासी शाळेत सेवक म्हणून कार्यरत आहे. ३१ जानेवारी रोजी दुपारी १२ ते १ वाजेच्या सुमारास, सातवीत शिकणाऱ्या पीयूष तलांडे (१३) व ११ लहान बालकांना मोबाइल चोरी का केला, असा जाब विचारला. विद्यार्थ्यांनी मोबाइल चोरी केला नाही, असे उत्तर देताच संतापाच्या भरात त्याने एकेकाला छडीने झोडपण्यास सुरुवात केली. ही मारहाण इतकी अमानुष होती की, त्यात बालकांना दुखापत झाली आहे.
आपल्या मुलाला आणि इतर बालकांना विनाकारण मारहाण झाल्याचे समजताच पीयूषचे वडील जीवन उर्फ जिब्बा देसू तलांडे (रा. पैमा, ता. एटापल्ली) यांनी तातडीने अहेरी पोलीस ठाणे गाठले. त्यांच्याफिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी अजय चंद्रगिरीवार विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(१) आणि बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ च्या कलम ७५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
घटनेनंतर शाळेत पोहोचलेल्या पालकांना तिथे एकही जबाबदार अधिकारी किंवा कर्मचारी आढळला नाही. नियमानुसार शाळेत अधीक्षक, अधीक्षिका, पहारेकरी आणि शिपाई उपस्थित असणे बंधनकारक आहे. मात्र, घटनेच्या वेळी शाळा प्रशासन पूर्णपणे बेपत्ता होते.
निवासी शाळेतील बालकांना मारहाण करणे हा गंभीर गुन्हा आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. – हर्षल ऐकरे, पोलीस निरीक्षक, अहेरी.

